गडचिरोलीविदर्भ

गांधीनगर येथे ८९१ नागरिकांना मोफत चष्मे वाटप, तर ११०० जणांची तपासणी

महानाम यज्ञ महोत्सवानिमित्त उषा निरंजन मंडल यांचा स्तुत्य उपक्रम; गरजूंवर होणार मोफत शस्त्रक्रिया

गडचिरोली : गांधी नगर येथील महानाम यज्ञ महोत्सवाचे औचित्य साधून समाजसेविका उषा निरंजन मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वितरण शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. गांधी नगर येथील हिंदी उच्च प्राथमिक केंद्र विद्यालयात पार पडलेल्या या शिबिरात ८९१ नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तर तब्बल १,१०० नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली.

जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने या शिबिरात रुग्णांची बारकाईने तपासणी केली. आरोग्यम हेल्थ केअर, नागपूर यांच्या सहकार्याने शिबिरात सुमारे १,१०० नागरिकांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी ८९१ नागरिकांना चष्मे, ६२० जणांना आय ड्रॉप्स, ५०० स्ट्रिप्स मल्टीव्हिटॅमिन कॅप्सूल्स मोफत देण्यात आले.

केवळ तपासणी आणि चष्मे देऊन हे शिबिर थांबले नाही, तर ज्या रुग्णांना मोतीबिंदू किंवा इतर गंभीर समस्यांमुळे शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, अशा रुग्णांची ओळख पटवण्यात आली आहे. या सर्व रुग्णांची पुढील शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केली जाणार असल्याची ग्वाही आयोजक सौ. उषा मंडल यांनी दिली.

यावेळी मार्गदर्शन करताना उषा मंडल यांनी नागरिकांना आरोग्याचा मंत्र दिला. त्या म्हणाल्या, “नियमित तपासणी, सकस आहार आणि मोबाईलचा मर्यादित वापर (स्क्रीन टाइम नियंत्रण) केल्यास डोळ्यांचे विकार टाळता येतात. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवणे हाच आमचा उद्देश असून भविष्यातही असे उपक्रम राबवले जातील.”

हे भव्य शिबिर यशस्वी करण्यासाठी राखी गौरंग मंडल आणि गौरंग गोपाल मंडल यांनी मोलाचे सहकार्य केले. गांधी नगर परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले आहेत. या शिबिरामुळे परिसरात आरोग्यविषयक जनजागृती होण्यास मोठी मदत झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button