आरोग्यगडचिरोलीविदर्भ

हिवताप निर्मूलनासाठी आरोग्य विभाग सज्ज ; प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांना विशेष ‘मायक्रोस्कोप प्रशिक्षण’

ICMR दिल्लीच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन ; जिल्ह्यात हिवतापाचे अचूक निदान होणार

गडचिरोली : जिल्ह्याला हिवतापमुक्त (मलेरिया मुक्त) करण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांसाठी ७ आणि ८ जानेवारी रोजी दोन दिवसीय विशेष ‘मायक्रोस्कोप प्रशिक्षण’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणातून आता जिल्ह्यातील हिवतापाचे निदान अधिक अचूक आणि जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.

जिल्हा आरोग्य विभाग, गडचिरोली यांच्या समन्वयाने आणि CHRI व PATH फाउंडेशन यांच्या सहकार्याने ही कार्यशाळा हॉटेल लँडमार्क येथे पार पडली. या प्रशिक्षणाचे मुख्य आकर्षण म्हणजे ICMR (भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद), नवी दिल्ली येथील तज्ज्ञ प्रशिक्षकांनी उपस्थित राहून जिल्ह्यातील प्रयोगशाळा अधिकाऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुजिता वाडीये यांची प्रमुख उपस्थिती होती.

दोन दिवसांच्या या सघन सत्रात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांना परजीवींची ओळख: मायक्रोस्कोपच्या माध्यमातून हिवतापाच्या परजीवींची अचूक ओळख पटवणे. आधुनिक पद्धती: निदानासाठी वापरल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या आधुनिक पद्धतींचा सराव. या बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले. CHRI PATH चे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी डॉ. अमित गंभीर आणि विभागीय समन्वयक डॉ. राखी शेंडे यांनी तांत्रिक बारकाव्यांवर सखोल प्रकाश टाकला.

हिवतापाच्या बाबतीत ‘अचूक निदान’ हाच उपचाराचा पाया असतो. निदानातील अचूकतेमुळे रुग्णांना वेळीच उपचार मिळतील आणि जिल्ह्यातील हिवतापाचे प्रमाण कमी करण्यास मोठे यश येईल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. ICMR दिल्लीच्या तज्ज्ञांच्या सहभागामुळे गडचिरोलीच्या आरोग्य यंत्रणेचा आत्मविश्वास दुणावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button