गडचिरोलीविदर्भ

‘जल, जंगल आणि जमिनीवर स्थानिकांचाच हक्क, बाहेरील शक्तींना थारा देणार नाही’ – अम्ब्रिशराव आत्राम यांचा इशारा

एटापल्ली : “जल, जंगल आणि जमीन ही येथील आदिवासी बांधवांची आणि स्थानिक जनतेची संपत्ती आहे. विकासाच्या नावाखाली कंपन्यांनी केलेली फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने घेतलेली जनसुनावणी खपवून घेतली जाणार नाही,” असा आक्रमक पवित्रा अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी घेतला.

एटापल्ली तालुक्यातील टिटोळा येथे आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्यात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी स्थानिक आमदार आणि नवीन कंपन्यांच्या धोरणांवर कडाडून टीका केली.

अध्यक्षीय भाषणात बोलताना राजे अम्ब्रिशराव आत्राम म्हणाले की, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे एटापल्ली परिसरातील मूलभूत समस्या आजही प्रलंबित आहेत. रस्ते, पाणी, आरोग्य यांसारख्या प्रश्नांसह तरुणांच्या हाताला काम मिळालेले नाही. उलट, परिसरात येणाऱ्या नवीन कंपन्यांनी जनतेची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने जनसुनावणी घेतल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण: कंपनीच्या मनमानीमुळे स्थानिक नागरिकांच्या हक्कांवर गदा येत असून, बाहेरील कोणाचाही अधिकार येथील जमिनीवर होऊ देणार नाही. रोजगाराचा प्रश्न: परिसरातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा लढा सुरूच राहील. जनसंवाद: मेळाव्यादरम्यान राजेंनी अनेक गावांतील नागरिकांच्या व्यथा ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

या मेळाव्याला आदिवासी आघाडीचे महामंत्री प्रशांत आत्राम, जिल्हा सचिव मोहन नामवर, तालुका अध्यक्ष प्रसाद पुल्लूरवार, माजी जि.प. सदस्य चुन्दू दोरपट्टी यांच्यासह बाबुराव पुंगाटी, रामू गोटा, रामजी वेळदा, मगरू वेळदा, मधुकर नरोटे, प्रवीण आलाम, विनोद दोरपट्टी, सत्तू हिचामी, पासू नरोटे आणि परिसरातील बहुसंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button