क्रीडागडचिरोलीविदर्भ

गोंडवाना विद्यापीठाच्या कुस्तीपटूंची राष्ट्रीय स्तरावर झेप ; सुवर्ण आणि रौप्य पदकावर कोरले नाव

ऑल इंडिया रेसलिंग गेम्समध्ये निशांत रुहिलला सुवर्ण, तर विजय करमबीरला रौप्य पदक

गडचिरोली : चंदीगड विद्यापीठ येथे पार पडलेल्या ‘ऑल इंडिया रेसलिंग गेम्स २०२५-२६’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. देशभरातील नामवंत विद्यापीठांच्या कुस्तीपटूंना धोबीपछाड देत गोंडवाना विद्यापीठाच्या खेळाडूंनी एक सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई करून विद्यापीठाचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर पोहोचवला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी (बाळापूर) येथील भगवान श्री चक्रधर स्वामी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ही देदीप्यमान कामगिरी केली आहे. निशांत रुहिल: फ्री स्टाईल ७४ किलो वजनगटात निशांतने आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. त्याला प्रशिक्षक समुंदर दलाल यांचे मार्गदर्शन लाभले. विजय करमबीर: ग्रीको-रोमन ८२ किलो वजनगटात विजयने दमदार चढाया करत रौप्यपदक आपल्या नावे केले. त्याला प्रशिक्षक आशिष देवतळे यांनी प्रशिक्षित केले.

संघाच्या या यशात संघ व्यवस्थापक डॉ. जंग बहादूर सिंग राठी यांचे नियोजन आणि शिस्तबद्ध नेतृत्व महत्त्वाचे ठरले. तसेच विद्यापीठाच्या क्रीडा संचालक डॉ. अनिता लोखंडे यांचे मोलाचे प्रोत्साहन व क्रीडा विभागाच्या सहकार्यामुळे खेळाडूंना हे यश संपादन करता आले.

खेळाडूंच्या या यशाबद्दल गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी खेळाडू, प्रशिक्षक व संघ व्यवस्थापकांचे मनापासून अभिनंदन केले आहे. “गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता या निकालामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे,” अशा शब्दांत विद्यापीठ प्रशासनाने खेळाडूंचे कौतुक केले.

या यशामुळे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, भविष्यातही या विद्यापीठाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button