गडचिरोलीविदर्भ

प्रा. मोहनलाल रामटेके यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

३२ वर्षांच्या निष्कलंक सेवेनंतर आरमोरी महाविद्यालयातून सेवानिवृत्त

आरमोरी : स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्वर्गीय नसरुद्दीनभाई पंजवानी वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी येथे ज्येष्ठ प्राध्यापक मोहनलाल रामटेके यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली स्टाफ वेल्फेअर समिती आणि स्टाफ कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर, सत्कारमूर्ती प्रा. मोहनलाल रामटेके, सौ. कल्पना रामटेके, डॉ. शशिकांत गेडाम आणि डॉ. विजय रेवतकर मंचावर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. खालसा यांनी प्रा. रामटेके यांच्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळाचा गौरव केला. ते म्हणाले की, “रामटेके सर हे केवळ एक शिक्षक नाहीत, तर ते एक अत्यंत प्रामाणिक, कार्यतत्पर आणि सहकारी वृत्तीचे व्यक्तिमत्व आहेत. प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून त्यांनी स्वतःला सिद्ध केले. अनेक मोठ्या संधी उपलब्ध असतानाही केवळ आई-वडिलांच्या सेवेसाठी त्यांनी स्थानिक स्तरावर राहून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे कार्य निवडले. त्यांचा हा त्याग आणि निगर्वीपणा नवीन पिढीसाठी प्रेरणादायी आहे.”

आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रा. मोहनलाल रामटेके भावूक झाले होते. त्यांनी ३३ वर्षांच्या प्रवासातील अनेक सुख-दुःखद आणि खुसखुशीत प्रसंग सर्वांसमोर मांडले. संस्थेचे पदाधिकारी, माजी प्राचार्य आणि विद्यमान प्राचार्य डॉ. खालसा यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर, डॉ. मनोज ठवरे, डॉ. शशिकांत गेडाम, डॉ. सीमा नागदेवे, डॉ. नोमेश मेश्राम, प्रा. सतेंद्र सोनटक्के आणि शिक्षकेतर कर्मचारी मोरेश्वर तागडे यांनी प्रा. रामटेके यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या हस्ते प्रा. रामटेके यांचा पुष्पगुच्छ, शाल, स्मृतीचिन्ह आणि गौरवपत्र प्रदान करून यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व गौरवपत्र वाचन प्रा. डॉ. विजय रैवतकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. जयेश पापडकर यांनी केले. प्रा. दिलीप घोनमोडे आणि सत्कार समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्याला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी प्रा. रामटेके यांना त्यांच्या पुढील सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button