
गोरेगाव : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांच्या संकल्पनेतून तालुक्यात एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे आरोग्य कर्मचारी आणि कुटुंब नियोजनासाठी पुढाकार घेणाऱ्या पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केलेल्या व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात आला.
गोरेगाव तालुक्यात ५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २५ आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांच्या माध्यमातून आरोग्य सेवा दिली जाते. सन २०२४-२५ या वर्षात कुटुंब कल्याण कार्यक्रमाची उद्दिष्टे यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या ९ कर्मचाऱ्यांचा (८ आरोग्य सेविका व १ आरोग्य सेवक) सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये आरोग्य सेविका ए.पी. सोनवाने, सी.बी. घासले, जे.एस. शेख, व्हि.टी. वाघमारे, रंजू रंगारी, आय.वाय. रहांगडाले, एल.डी. पटले, बी.बो. रहांगडाले. आरोग्य सेवक एल.एम. हरीणखेडे (मोहगाव उपकेंद्र) यांचा समावेश आहे.
कुटुंब नियोजनाच्या मोहिमेत पुरुषांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने प्रोत्साहित करण्यासाठी तालुक्यातील ५ जागरूक नागरिकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये योगेंद्र नान्हे, भूपेंद्र चौधरी, दिनेश कोल्हे, राजेंद्र नाईक आणि प्रभुदास किरसान यांचा समावेश होता.
“आरोग्य सेवा आणि जनजागृतीमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व आशा सेविकांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या कार्याची दखल घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होते.” असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद चव्हाण म्हणाले.
तालुका आरोग्य कार्यालयात आयोजित या सोहळ्याला पंचायत समिती गोरेगावचे खंड विकास अधिकारी गौतम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद चव्हाण आणि डॉ. कीर्ती चुलपार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य सहाय्यक रवी पटले आणि पर्यवेक्षक राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी तालुक्यातील आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



