भंडाराविदर्भ

भंडारा आयटीआयचा महाराष्ट्रात डंका! ; राज्य कौशल्य स्पर्धेत ४ सुवर्ण पदकांसह पटकावला ‘नंबर १’ चा बहुमान

भंडारा : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेत’ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), भंडारा येथील प्रशिक्षणार्थ्यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या स्पर्धेत संस्थेने ४ सुवर्ण आणि १ रौप्य अशी एकूण ५ पदके पटकावून, संपूर्ण महाराष्ट्रात एकाच संस्थेने सर्वाधिक पदके मिळवण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.

१ ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुंबईतील डॉन बॉस्को लर्निंग सेंटर, कुर्ला येथे ही राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली. नागपूर विभाग स्तरावरून निवड झालेल्या भंडाऱ्याच्या १८ गुणवंत प्रशिक्षणार्थ्यांनी या अटीतटीच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. आपल्या कौशल्याच्या जोरावर त्यांनी परीक्षकांची मने जिंकत पदकांची लयलूट केली. सुवर्ण पदक विशाखा पागोटे ट्रेड टर्नर, निशांत नागपुरे ट्रेड टर्नर, अमित बिल्लोरे ट्रेड मेकॅनिक मोटार व्हेईकलस, रितेश बालपांडे ट्रेड रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग टेक्निशिअन तर रौप्य पदक भूषण काठगाये ट्रेड मेकॅनिक मोटार व्हेईकल यांनी पदकांची कमाई केली.

या यशाबद्दल बोलताना मार्गदर्शक निदेशक प्रतिक सतदेवे, दिपक लंजे आणि रवी कावळे यांनी सांगितले की, “नागपूर क्लस्टरपासून प्रशिक्षणार्थ्यांनी दाखवलेल्या सातत्याचे हे फळ आहे. १८ मुले राज्यस्तरापर्यंत पोहोचणे हीच मोठी बाब होती, पण आता ४ सुवर्ण पदकांसह आम्ही राज्यात प्रथम क्रमांकाची संस्था ठरलो आहोत. हे सर्व विजेते आता ‘इंडिया स्किल्स’ (IndiaSkills) या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज आहेत.”

भंडारा सारख्या जिल्ह्यातुन आलेल्या ग्रामीण भागातील मुलांनी मुंबईत मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्याचे नाव राज्यभर गाजत आहे. या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य व्ही. एम. लाकडे, गटनिदेशक एम. एस. बदुकले, एस. डब्ल्यू. शेंडे आणि भांडारपाल मोहाळे यांनी विजेत्यांचे व त्यांच्या मार्गदर्शकांचे विशेष कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button