गडचिरोलीविदर्भ

माजी सैनिकाची गुरवळा जंगलात गळफास लावून आत्महत्या

‘प्रेस‘ लिहिलेल्या दुचाकीमुळे गूढ वाढले; कौटुंबिक कलहातून टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज

गडचिरोली : शहरालगतच्या राखी-गुरवळा मार्गावरील जंगलात एका माजी सैनिकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी, ६ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. भास्कर गिरमा बांबोळे (४४, रा. वनश्री कॉलनी, गडचिरोली) असे मृत माजी सैनिकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या दुचाकीवर असलेल्या ‘प्रेस’ या अक्षरांमुळे आता नवीन तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भास्कर बांबोळे हे माजी सैनिक होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरात कौटुंबिक कारणावरून सातत्याने भांडणे होत होती. याच वादाला कंटाळून ५ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास ते आपली दुचाकी (क्रमांक MH 34 AL 0880) घेऊन घराबाहेर पडले. शहरापासून साधारण दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गुरवळा रोडवरील जंगलात त्यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि आत झाडाला दोरीने बांधून गळफास घेतला.

६ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास काही नागरिक ‘मॉर्निंग वॉक’साठी या मार्गावरून जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक दुचाकी संशयास्पद स्थितीत उभी दिसली. दुसरीकडे, भास्कर हे रात्रभर घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला होता. शोधादरम्यान ही दुचाकी आणि त्यानंतर जवळच असलेल्या झाडाला भास्कर यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

या घटनेत सर्वात संशयास्पद बाब म्हणजे भास्कर बांबोळे वापरत असलेल्या दुचाकीवर ‘प्रेस’ असे लिहिलेले आहे. प्रत्यक्षात ते पत्रकार नव्हते, तरीही त्यांच्या गाडीवर असा उल्लेख का होता? ती गाडी नेमकी कुणाची? या दिशेने आता गडचिरोली पोलीस तपास करत आहेत. एखाद्या गैरकृत्यासाठी किंवा ओळख लपवण्यासाठी या नावाचा वापर केला जात होता का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी मर्ग दाखल केला असून, आत्महत्येचे नेमके कारण आणि दुचाकीबाबतचे गूढ उकलण्यासाठी अधिक तपास सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button