गडचिरोलीविदर्भ

सहविचार सभेत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांवर चर्चा

गडचिरोलीत शिक्षण विभागाची मॅरेथॉन बैठक; ५ प्रकरणे तात्काळ निकाली, तर लेखाधिकारी कार्यालयाच्या चौकशीचे आदेश

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांना अखेर न्याय मिळाला आहे. आमदार सुधाकर अडबाले यांच्या प्रमुख उपस्थितीत १७ फेब्रुवारी रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या सभेत ५ महत्त्वाची प्रकरणे “ऑन द स्पॉट” निकाली काढण्यात आली. तसेच, कामकाजात हलगर्जीपणा करणाऱ्या लेखाधिकारी कार्यालयाची तात्काळ चौकशी करण्याचे कडक निर्देश आमदारांनी दिले आहेत.

जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत शिक्षण विभागाच्या लेखाधिकारी कार्यालयाबाबत कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. या बाबींची गंभीर दखल घेत आमदार अडबाले यांनी संबंधित आस्थापनेची तात्काळ चौकशी सुरू करून केलेल्या कार्यवाहीची नोंद इतिवृत्तात घेण्याचे आदेश दिले. यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सभेमध्ये सविस्तर चर्चेनंतर खालील प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात आली: १. राजेश सातपुते (श्री साईनाथ विद्यालय, मक्केपल्ली): वरिष्ठ श्रेणी प्रकरण मंजूर. २. नागेश्वर गेडाम (शिवाजी हायस्कूल, कुरखेडा): निवड श्रेणी प्रकरण मार्गी. ३. प्रकाश मठे (विवेकानंद विद्यालय, मानापूर देलनवाडी): निवड श्रेणी प्रकरण निकाली. ४. पी. डी. दुधे (भगवंतराव हायस्कूल, नरसिंहापल्ली): आर्थिक व प्रशासकीय अधिकार प्रदान. ५. धनेंद्र चौधरी (शिवाजी हायस्कूल, गडचिरोली): उपमुख्याध्यापक पदोन्नतीला पुढील आदेशापर्यंत मान्यता.

वैयक्तिक प्रकरणांव्यतिरिक्त अनुकंपा नियुक्ती, शालार्थ आयडी, मुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदांच्या मान्यता, वरिष्ठ व निवड श्रेणी, प्रलंबित वैद्यकीय देयके, पेन्शन केसेस आणि वेतनेतर अनुदानावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. उर्वरित सर्व प्रलंबित प्रकरणे २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत निकाली काढावीत, अशा सक्त सूचना आमदार अडबाले यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

या बैठकीला माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, वेतन पथक अधीक्षक विवेक नाकाडे, उपशिक्षणाधिकारी अमर गेडाम यांच्यासह महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे सदस्य दिलीप गडपल्लीवार, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नैताम, जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, कार्याध्यक्ष नरेंद्र भोयर, विजुक्टाचे जिल्हाध्यक्ष विजय कुत्तरमारे आणि मोठ्या संख्येने शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button