गडचिरोलीविदर्भ

आलदंडी येथे २८४ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

प्रोजेक्ट उडान अंतर्गत आरोग्य शिबीर व जनजागरण मेळाव्याचे आयोजन

गडचिरोली : अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी आणि त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर आहे. याच सामाजिक बांधिलकीतून ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत हेडरी उपविभागातील पोस्टे आलदंडी येथे २७ फेब्रुवारी रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर व जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात नागपूरच्या शालीनीताई मेघे रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा दिली. यामध्ये नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. गगन गायकवाड, डॉ. मयुर नागोसे आणि फिजिशियन डॉ. श्रिनीवास त्रिवेदी व डॉ. राहुल कुमार यांनी नागरिकांची सखोल तपासणी केली.

हेडरी उपविभागातील सुमारे २८४ नागरिकांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. ६० ज्येष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली असून, पुढील उपचारांसाठी आवश्यक शिफारसी करण्यात आल्या. ब्लड प्रेशर, डायबेटीस व इतर आजारांची मोफत तपासणी करून योग्य आहार आणि पोषणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य तपासणीसोबतच शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

गडचिरोली पोलीस दल केवळ नक्षलविरोधी अभियानच राबवत नाही, तर सामाजिक बांधिलकी देखील तितक्याच ताकदीने जपते आहे: आरोग्य मेळावे: आतापर्यंत १८० मेळाव्यांतून ४०,४७५ नागरिकांची तपासणी. रक्तदान: ५ शिबिरांतून ४,३६१ युनिट रक्ताचे संकलन. ऑपरेशन रोशनी: ९,९७१ नागरिकांची नेत्रतपासणी आणि १,४१२ जणांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., आणि उपविभागीय पोलीस अधिकारी योगेश रांजणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आलदंडीचे प्रभारी अधिकारी अमोल भोसले, पदमसिंग दुल्हत, विकास शिरकुळे, ईश्वर सुरवसे व नागरी कृती शाखेचे चंद्रकांत शेळके यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button