
आरमोरी : तालुक्यातील अरसोडा येथे मुक्तिपथ अभियान आणि ग्रामस्थांच्या वतीने दोन दिवसीय सघन भेट उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून दोन दारू व सिंधी विक्रेत्यांवर अहिंसक कृती करून सुमारे १०,००० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला, तसेच ८ विक्रेत्यांकडून ‘यापुढे दारू विकणार नाही’ अशा आशयाचे शपथपत्र लिहून घेण्यात आले.
अरसोडा येथील सघन गाव भेटीच्या पहिल्या दिवशी प्रकाश भोयर यांच्या निवासस्थानी युवकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. नगरसेवक सूरज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगरसेविका सुनीता भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीत ‘मुक्तिपथ ग्रामीण/शहरी युवा संघटना’ गठीत करण्यात आली. गावात चालणारी अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद करण्याचा ठराव यावेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र सहारे व पोलीस कॉन्स्टेबल यांनी दोन विक्रेत्यांकडील १०,००० रुपये किमतीची दारू व सिंधी नष्ट केली.
गाव भेटीच्या दुसऱ्या दिवशी युवा संघटना, गाव/वार्ड संघटना आणि मुक्तिपथ शक्तीपथ स्त्री संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ८ दारू विक्रेत्यांची भेट घेतली. “मी आजपासून दारूची विक्री करणार नाही,” अशा प्रकारचे शपथपत्र या विक्रेत्यांकडून लिहून घेण्यात आले. तसेच, पुन्हा दारूविक्री केल्यास दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या मोहिमेत नगरसेवक सूरज भोयर, नगरसेविका सुनीता भोयर, पोलीस पाटील अतुल भोयर यांच्यासह युवक सहभागी झाले होते. मुक्तिपथचे तालुका संघटक विनोद कोहपरे यांनी उपस्थितांना दारूबंदी कायद्याची सविस्तर माहिती दिली. यावेळी युवा संघटना आणि गाव संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गावातील अवैध दारू हद्दपार करण्याचा निर्धार केला आहे. या मोहिमेमुळे अरसोडा परिसरात अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.



