क्राईमगोंदियाविदर्भ

विटभट्टीवरील कारवाई टाळण्यासाठी १० हजारांची लाच, ग्राम महसूल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ

गोंदिया : माती उत्खननाच्या प्रकरणात विटभट्टी मालकावर होणारी कारवाई टाळण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या एका महिला ग्राम महसूल अधिकाऱ्याला गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. गायत्री बोरकर (वय ४१) असे आरोपी महिला अधिकाऱ्याचे नाव असून, १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण महसूल यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.

तक्रारदार महिला ही विटभट्टी चालक आहे. त्यांच्या विटभट्टीवर माती उत्खननाचे एक प्रकरण सुरू होते. या प्रकरणात कोणतीही दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी गायत्री बोरकर यांनी तक्रारदाराकडे ३७,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेचा हा आकडा ठरल्यानंतर, १२ मार्च रोजी बोरकर यांनी १०,००० रुपये अगोदरच स्वीकारले होते. मात्र, उर्वरित रकमेसाठी त्या तक्रारदार महिलेवर सतत दबाव टाकत होत्या.

उर्वरित लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार महिलेने गोंदिया एसीबी कार्यालयात धाव घेऊन तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, २३ मार्च रोजी अर्जुनी मोरगाव येथे सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे, जेव्हा तक्रारदार महिला १० हजार रुपये देण्यासाठी बोरकर यांच्याकडे पोहोचली, तेव्हा ही रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

कारवाईदरम्यान लाचेची १० हजार रुपयांची रोख रक्कम आणि आरोपीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, महिला आरोपी असल्याने गायत्री बोरकर यांना २४ मार्च रोजी अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

ही यशस्वी कारवाई एसीबीचे पोलीस निरीक्षक उमाकांत उगले व अरविंद राऊत यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात सहायक उपनिरीक्षक चंद्रकांत करपे, अंमलदार संजय बोहरा, मंगेश काहलकर, संतोष शेंडे, अशोक कापसे, संतोष बोपचे, प्रशांत सोनावणे, कैलाश काटकर, संगीता पाटले, रोहिणी डांगे आणि दीपक बटबर्वे यांचा समावेश होता.

भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, कोणीही शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ एसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button