
एटापल्ली : तालुक्यातील शासकीय कार्यालयांना तंबाखूमुक्त करण्यासाठी ‘मुक्तिपथ’ जिल्हा दारू तंबाखूमुक्त प्रशासकीय पथकाद्वारे शहरात धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन शासकीय कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून शहरातील पानठेल्यांची सुद्धा तपासणी करण्यात आली.
मुक्तिपथ पथकाने एटापल्ली शहरातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी अचानक भेट देऊन तपासणी केली. या तपासणी दरम्यान तीन कर्मचारी तंबाखू आणि खर्रा बाळगून असल्याचे आढळून आले. कार्यालयाचे पावित्र्य भंग केल्याप्रकरणी या तिन्ही कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कार्यालयांसोबतच पथकाने शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठानांचीही तपासणी केली. एका पानठेल्याची झडती घेतली असता तिथे सुगंधित तंबाखू आढळून आली. पथकाने दोन डबे तंबाखू जप्त करून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी तंबाखूमुक्त वातावरण राखण्यासाठी ही मोहीम यापुढेही तीव्र करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या कारवाईमुळे तंबाखू व खर्रा शौकिन कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.



