गडचिरोलीविदर्भ

पल्लीसारखी गावे स्वावलंबी विकासाचे आदर्श मॉडेल – सीईओ सुहास गाडे

भामरागड दौऱ्यात आरोग्य, शेती, पाणी, शिक्षण व ग्रामविकासाचा सखोल आढावा

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातही स्थानिक साधनसंपत्तीच्या प्रभावी वापरातून स्वावलंबी विकास साधता येतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून पल्ली गाव पुढे येत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले. त्यांनी नुकतीच पल्ली व टेकला ग्रामपंचायतींना भेट देऊन विविध योजनांची सखोल पाहणी करत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.

पल्ली गावात मोठ्या प्रमाणावर आंब्याची झाडे, घरोघरी परसबागा, भाजीपाला उत्पादन तसेच कुक्कुटपालन यांसारखे उपजीविकेचे पूरक व्यवसाय विकसित झाल्याचे निदर्शनास आले. येथून उत्पादित होणारा विषमुक्त भाजीपाला भामरागड बाजारात मोठ्या मागणीने विकला जात असून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आंबा उत्पादनाचे मूल्यवर्धन करून बचत गटांच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत गाडे यांनी सरपंच, ग्रामस्थ व महिला बचत गट सदस्यांशी संवाद साधत विविध योजनांचा आढावा घेतला. बचत गटांना दिलेल्या निधीतून कुक्कुटपालन, शेळीपालन, भाजीपाला लागवड यांसारखे व्यवसाय सुरू करण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. समुदाय गुंतवणूक निधी (CIF) चा प्रभावी वापर करून उत्पन्नवाढीच्या संधी निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले.

पल्ली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन औषधसाठ्याची पाहणी करण्यात आली. महिलांची आरोग्य तपासणी, रक्ताल्पता स्थिती, आरोग्य शिबिरे, फॉलिक आम्ल गोळ्यांचे वितरण, आयुष्मान भारत व इतर योजनांचा लाभ याबाबत त्यांनी माहिती घेतली. अंगणवाडीत मुलांचे वजन-उंची मोजमाप, अमृत आहार वितरण तसेच स्वच्छतेच्या सुविधा याबाबतही तपासणी करण्यात आली. आशा कार्यकर्त्यांच्या भेटींची नियमितता व सेवा वितरण यावर त्यांनी भर दिला.

ग्रामविकासाच्या दृष्टीने १५ व्या वित्त आयोगाचा निधी, दिव्यांगांसाठी राखीव निधीचा वापर, पेसा अंतर्गत कामे, लोकसहभागातून झालेली विकासकामे, बंधारे बांधकाम याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. ग्रामपंचायत सौरऊर्जेवर आणण्याचा प्रयत्न करावा व त्यानंतर इतर गावांमध्येही हा नमुना राबवावा, अशी सूचना त्यांनी दिली. पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेताना पाणीपुरवठा सुरळीत आहे का, क्लोरीन साठा, पाण्याची गुणवत्ता तपासणी, तसेच पाणीपट्टी वसुलीबाबत त्यांनी विशेष लक्ष वेधले. पाणीपुरवठा योजनांची शाश्वतता राखण्यासाठी पाणीपट्टी वसुली अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षण क्षेत्रात शालेय मुलांची अक्षर व अंक ओळख तपासण्यात आली. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रोत्साहन देत चांगले गुण मिळविण्यासाठी प्रेरित करण्यात आले. जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक गावात क्रीडांगण उभारण्याच्या उपक्रमामुळे युवकांना विविध खेळांसह पोलीस भरतीची तयारी करता येईल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर ग्रामपंचायत टेकला येथेही भेट देऊन अशाच प्रकारे सर्व योजनांचा आढावा घेण्यात आला. ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना विविध दाखले उपलब्ध करून देण्यावर भर देत तहसील कार्यालयात अनावश्यक फेऱ्या टाळण्याचे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button