गडचिरोलीविदर्भ

फराडा येथे ३ हजाराची दारू जप्त ; दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल

मुक्तीपथ गाव संघटन व पोलिसांची कारवाई

चामोर्शी : तालुक्यातील फराडा येथे मुक्तीपथ गाव संघटन आणि चामोर्शी पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी बसस्थानक परिसरातून ३ हजार रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली असून, संबंधित विक्रेत्यावर चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फराडा गावात मागील दोन वर्षांपासून महिला गाव संघटनेच्या प्रयत्नांमुळे दारू विक्री बंद होती. मात्र, काही विक्रेते शेजारील भेंडाळा येथून दारू आणून ती चोरट्या मार्गाने, खिशात बाळगून किंवा शेतशिवाराचा आडोसा घेऊन विक्री करत असल्याची माहिती समोर आली होती. या अवैध विक्रीमुळे गावात भांडणाचे प्रमाण वाढले होते, ज्याची दखल शक्तीपथ संघटन आणि ग्रामपंचायत समितीने घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गाव संघटन महिलांनी एकत्रितपणे सर्व दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन अहिंसक कृती करीत विक्रेत्यांना समज दिली. त्यानंतर गावातील विविध ठिकाणांवर पाळत ठेवली असता, बस स्टॉप परिसरात दारूची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. महिलांनी तत्काळ ही दारू पकडून पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक जगताप यांनी केली. सुवर्णा मुनघाटे, पुष्पा भोयर, छाया खेडेकर, लिंबूना चौधरी, पपीता हजारे, वैशाली उंदिरवाडे, अर्चना लांबडे यांच्यासह मुक्तीपथचे तालुका संघटक आनंद इंगळे व त्यांची चमू उपस्थित होती. गावात सध्या दारू विक्री पूर्णपणे बंद असून, यापुढेही अवैध विक्री सुरू झाल्यास अधिक कडक कारवाई करण्याचा इशारा महिला संघटन आणि प्रशासनाने दिला आहे. विशेष म्हणजे, नजिकच्या भेंडाळा गावातून परिसरातील किरकोळ विक्रेत्यांना दारू पुरवठा होत असल्याने व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भेंडाळा येथील विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button