
डोळ्यांसमोर आई-वडिलांना गमावलेल्या ‘सिया’च्या आक्रोशाने पाणावले उपस्थितांचे डोळे
चामोर्शी : आष्टी-चंद्रपूर मार्गावरील धानापूर जिनिंगजवळ सोमवारी दुपारी एक काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. एका भरधाव मालवाहू ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातात त्यांच्या ६ वर्षांच्या चिमुकलीचा जीव थोडक्यात वाचला असला, तरी तिच्या डोळ्यांसमोरच आई-वडिलांनी जगाचा निरोप घेतल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांमध्ये गौतम सुरेश निमसरकर (वय ३६) आणि त्यांची पत्नी वैशाली गौतम निमसरकर (वय ३०, रा. अनखोडा, ता. चामोर्शी) यांचा समावेश आहे. निमसरकर दांपत्य आपल्या ६ वर्षांच्या मुलीसह (सिया) कामानिमित्त चंद्रपूर येथे गेले होते. काम आटोपून आपल्या गावी परतत असताना, धानापूर येथील जिनिंगजवळ एका मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत गौतम निमसरकर यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या वैशाली निमसरकर यांना तातडीने गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूरला हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
अपघाताच्या वेळी ६ वर्षांची सिया दुचाकीवरून दूर फेकली गेल्याने तिला गंभीर दुखापत झाली नाही आणि ती नशिबाने बचावली. मात्र, आपल्या समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आई-वडिलांना पाहून तिने जो आक्रोश केला, त्याने तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. या चिमुकलीच्या डोक्यावरील छत्र एका क्षणात हिरावले गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गौतम निमसरकर हे अनखोडा ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मनमिळावू आणि कार्यतत्पर स्वभावामुळे ते संपूर्ण परिसरात परिचयाचे होते. एका हसतखेळत असलेल्या कुटुंबाचा अशा प्रकारे अंत झाल्याने अनखोडा गावावर शोककळा पसरली आहे.या घटनेनंतर पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, अपघाताच्या वाढत्या घटनांमुळे या मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



