
एटापल्ली : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पेठा गावाने व्यसनमुक्तीच्या जोरावर विकासाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. गेल्या चार वर्षांपासून या गावात राबविण्यात येत असलेल्या कडक दारूविक्रीबंदीमुळे गावाची वाटचाल आता सुख-समृद्धीकडे सुरू झाली असून, कौटुंबिक कलह हद्दपार झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पेठा गावातील ग्रामस्थांनी चार वर्षांपूर्वी ग्रामसभेत एकत्र येत दारूविक्री बंदीचा ठराव घेतला होता. विशेष म्हणजे, ही बंदी केवळ कागदावर मर्यादित न ठेवता ग्रामस्थांनी ती प्रत्यक्ष अमलात आणली आहे. गावात कोणीही दारू विक्रीचा प्रयत्न केल्यास त्याला १०,००० रुपये दंड ठोठावण्याचा कडक नियम गाव संघटनेने लागू केला आहे. या नियमाच्या धाकामुळे आणि लोकसहभागामुळे गावात अवैध दारूविक्रीला पूर्णपणे खिळ बसली आहे. या बंदीचा सर्वात मोठा सकारात्मक परिणाम गावातील तरुणांवर झाला आहे. व्यसनाच्या आहारी गेलेला तरुण वर्ग आता कामाकडे वळला असून, त्यामुळे घराघरांत आर्थिक सुबत्ता येत आहे. दारूमुळे होणारी भांडणे आता थांबली असून गावात शांतता नांदत आहे, अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
गावात व्यसनमुक्तीचे हे कार्य यशस्वी करण्यासाठी ‘मुक्तीपथ गाव संघटन’ आणि ‘शक्तीपथ स्त्री संघटना’ यांचे एकूण ५६ सदस्य अहोरात्र कार्यरत आहेत. मुक्तीपथतर्फे गावात ‘व्यसन उपचार शिबिर’ आयोजित करून व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दुर्गम भागात असूनही पेठा गावाने दाखवलेली ही इच्छाशक्ती इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सरपंच वनिताताई कोरामी, पोलीस पाटील दशा कोरामी, आशा कार्यकर्ती शीतलताई वेलादी आणि अंगणवाडी सेविका तोंदेवार या चळवळीचे नेतृत्व करत आहेत. मुक्तीपथचे तालुका संघटक किशोर मल्लेवार व प्रेरक समीक्षा कूळमेथे हे विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामस्थांना सातत्याने मार्गदर्शन करत आहेत.



