
तहसीलदारांमार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन
आरमोरी : शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रलंबित प्रश्नांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन (तालुका आरमोरी) यांच्या संयुक्त विद्यमाने २० एप्रिल रोजी आरमोरी तहसील कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारने केलेला भारत-अमेरिका व्यापार करार रद्द करावा आणि जुनाच मनरेगा कायदा कायम ठेवावा, अशा प्रमुख मागण्यांसह विविध समस्यांचे निवेदन तहसीलदारामार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व करताना डॉ. महेश कोपुलवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. भारत-अमेरिका व्यापार करारामुळे अमेरिकेचा शेतीमाल भारतीय बाजारपेठेत आल्यास भारतीय शेतकरी स्पर्धेत टिकणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हमीभावावर गदा येईल, अशी भीती व्यक्त करत हा करार तत्काळ रद्द करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शेतमजुरांच्या रोजगारावर गदा आणणारा नवीन ‘व्ही. बी. रामजी’ कायदा रद्द करून जुनाच मनरेगा (रोजगार हमी) कायदा कायम ठेवण्याची मागणी शेतमजूर युनियनने केली आहे. या नवीन कायद्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांचा हक्काचा रोजगार हिरावला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
घरकुल योजना: घरकुल बांधण्यासाठी मिळणारे आर्थिक सहाय्य तोकडे असून, लाभार्थ्यांना ५ लाख रुपये मिळावेत. महागाईवर नियंत्रण: अमेरिका व इस्रायलच्या इराणवरील आक्रमणामुळे जागतिक महागाई वाढली आहे. केंद्र सरकारने हे युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घ्यावा. वन्यजीव समस्या: जिल्ह्यातील वाघांच्या वाढत्या हल्ल्यांवर ठोस उपाययोजना कराव्यात. सामाजिक सुरक्षा: शेतकरी व शेतमजुरांना मासिक ५,००० रुपये पेन्शन देणारा कायदा लागू करावा. शिक्षण व आरोग्य: ग्रामीण भागातील मराठी शाळा बंद करू नयेत. पीएससी स्तरावरील आरोग्य व्यवस्था अद्ययावत करून तपासणी शुल्क रद्द करावे. शेतीमालाला दर: उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव आणि धान उत्पादकांना बोनस जाहीर करावा. कर्जमाफी: शेतकरी, शेतमजूर व कामगारांची सरसकट कर्जमाफी करावी. इतर मागण्या: मका खरेदी केंद्र त्वरित सुरू करा आणि जबरानजोत धारकांना जमिनीचे पट्टे द्या. या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. महेश कोपुलवार, लालबावटा शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष प्रकाश खोब्रागडे, महिला फेडरेशनच्या जिल्हाध्यक्ष मीनाक्षी सेलोकर, जिल्हा सचिव प्रशांत खोब्रागडे यांनी केले. यावेळी केवळराम नागोसे, सिंधू कापकर (नगरसेविका), चुन्नीलाल मोटघरे, ऋषी रामटेके, डंबाजी नरुले, हरिदास निखुरे, भगवान राऊत, मनोज दामले, राजाराम मडावी यांच्यासह शेकडो शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आरमोरी येथील या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात चांगलीच धावपळ उडाली असून, सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा डॉ. कोपुलवार यांनी दिला आहे.



