नागपूरपुणेमहाराष्ट्रविदर्भ

पुण्यात रंगणार कबड्डी, कुस्ती, खो-खोचा थरार! ; ४७ व्या राष्ट्रीय विद्युत क्रीडा स्पर्धेचे ६ मे पासून आयोजन

१० राज्यांतील ४१ संघ आणि ५३८ खेळाडूंचा सहभाग

नागपूर : अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या वतीने आयोजित ४७ व्या राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती, खो-खो व बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद यंदा पुण्याला मिळाले आहे. पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये बुधवार, ६ मे ते शुक्रवार, ८ मे २०२६ या कालावधीत ही भव्य राष्ट्रीय स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत देशभरातील विविध विद्युत कंपन्यांचे खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात, हरियाणा, तेलंगाणा, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश आणि दिल्ली या राज्यांतील सरकारी व खासगी विद्युत कंपन्यांचे ४१ संघ सहभागी होत आहेत. यामध्ये सुमारे ५३८ महिला व पुरुष खेळाडूंचा समावेश आहे.

कबड्डी आणि खो-खो या खेळांमध्ये पुरुष व महिला दोन्ही गटांचे संघ मैदानात उतरतील. कुस्ती आणि बास्केटबॉल या स्पर्धा केवळ पुरुष गटासाठी आयोजित करण्यात आल्या आहेत. कबड्डीमध्ये १८ संघ, खो-खोसाठी ९ संघ, तर कुस्ती आणि बास्केटबॉलमध्ये प्रत्येकी ७ संघ अजिंक्यपदासाठी झुंज देतील.

स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (दि. ६) सकाळी ९:३० वाजता राज्याच्या ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्या उपस्थितीत आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्याच्या क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असेल. शुक्रवारी (दि. ८) सायंकाळी ५ वाजता महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीवकुमार आणि महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक  राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ पार पडेल.

महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे प्रादेशिक संचालक सुनील काकडे (अध्यक्ष, आयोजन समिती) आणि त्यांच्या टीमने या स्पर्धेची जय्यत तयारी केली आहे. या समितीमध्ये महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोलप, अधीक्षक अभियंता अशोक घाडगे आणि मुख्य समन्वयक संजय ढोके व पुरुषोत्तम वारजुरकर यांचा समावेश आहे.

या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे देशभरातील विद्युत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये क्रीडा संस्कृती जोपासली जाणार असून, चुरशीच्या लढती पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button