
अगतिकतेचा फायदा घेत अज्ञाताचे नीच कृत्य; भिसी पोलिसांत गुन्हा दाखल, परिसरात तीव्र संताप
चिमूर : तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना ७ मे रोजी उघडकीस आली. एका ३७ वर्षीय अनाथ आणि गतिमंद महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत अज्ञात नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. या अमानवीय कृत्यामुळे संबंधित महिला ५ महिन्यांची गर्भवती राहिल्याचे समोर आले असून, या घटनेने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
संबंधित महिला जन्मतःच गतिमंद असून तिला बोलता येत नाही. आई-वडिलांच्या निधनानंतर ती पूर्णपणे अनाथ झाली होती. तिचा लहान भाऊ उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी राहत असल्याने गावात तिची देखभाल करणारे कोणीही नव्हते. ही महिला गावातच भटकून आणि लोकांकडे अन्न मागून आपला उदरनिर्वाह करत होती. तिच्या याच अगतिकतेचा गैरफायदा अज्ञात आरोपीने घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गावातील आशा सेविका आणि काही सजग महिलांना संबंधित महिलेच्या शरीरयष्टी आणि हालचालींमध्ये बदल जाणवला. तिचे पोट पुढे आल्याचे दिसल्याने संशय बळावला आणि महिलांनी तिला तातडीने शासकीय दवाखान्यात तपासणीसाठी नेले. वैद्यकीय तपासणीअंती ती महिला पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी घोषित करताच परिसरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच महिलेच्या भावाने भिसी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास भिसीचे ठाणेदार मंगेश भोंगळे, पोलीस उपनिरीक्षक रवी वाघ, हवालदार दुर्गेश नन्नावरे व घोडमारे करीत आहेत.
अशा अगतिक महिलेवर झालेल्या अत्याचारामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप असून, या नराधमाला लवकरात लवकर बेड्या ठोकून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.



