क्राईमगडचिरोलीविदर्भ

बोथेडा आणि मुरुमबोडी जंगलपरिसरात २८ ड्रम मोह सळवा नष्ट

गडचिरोली पोलिसांसह निर्माण व मुक्तिपथची कृती

गडचिरोली : तालुक्यातील बोथेडा आणि मुरुमबोडी येथील जंगलपरिसराचा गैरफायदा घेत सुरू असलेल्या अवैध दारू निर्मितीवर पोलीस विभाग, निर्माण आणि मुक्तिपथच्या पथकाने संयुक्तरीत्या नुकतीच कृती केली आहे. या मोहिमेत तब्बल २८ ड्रम मोह सळवा आणि दारू गाळण्याचे साहित्य आढळून आले. साहित्याच्या ठिकाणी कुणीही विक्रेते नव्हते, त्यानुसार सदर साहित्य जागीच नष्ट करण्यात आले.

बोथेडा व मुरुमबोडी परिसरातील घनदाट जंगलाचा आधार घेत काही विक्रेते अवैध मोहफूल दारूची गाळण करत होते. आजूबाजूच्या गावात दारू विक्री बंद असल्याने दारू शौकीन या गावात दारू पिण्याकरिता गर्दी करत होते. हे थांबावे या हेतूने पोलीस विभाग, मुक्तिपथ यांची वारंवार  या भागात कारवाई सुरू आहे. परिणामत: जंगलातील दारू गाळण प्रमाण कमी झाले असले तरी  विक्रेत्यांनी हा अवैध व्यवसाय पूर्णत: बंद करावा यासाठी ‘निर्माण’ आणि ‘मुक्तिपथ’ चमुसह पोलीस विभागाने जंगलात शोधमोहीम राबवून ही संयुक्त कृती केली आहे.

संयुक्त पथकाने जंगलात शोधमोहीम राबवली असता, वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेले २८ ड्रम मोह सळवा आणि दारू गाळण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले. पथकाने तात्काळ हे सर्व साहित्य आणि सळवा नष्ट केला. या मोहिमेत पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या संयुक्त मोहिमेमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

या कारवाईदरम्यान पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी उपस्थित ‘निर्माण’च्या युवकांना विशेष मार्गदर्शन केले. आजचा युवक व्यसनाधीनतेपासून कसा दूर राहू शकेल आणि सामाजिक कार्यात कसे योगदान देऊ शकेल, याबाबत त्यांनी मोलाचे विचार मांडले. यावेळी त्यांनी ‘मुक्तिपथ’च्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “मुक्तिपथ प्रकल्प संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात गावागावात व्यसनमुक्तीसाठी काम करत आहे. त्यांच्या या कामामुळे पोलीस विभाग आणि समाजाला मोठी मदत होत आहे. यावेळी पोलिस कर्मचारी, मुक्तिपथ गडचिरोली व धानोरा टीम, निर्माण शिबिरार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button