
गडचिरोली : चामोर्शी येथे एका निष्पाप अल्पवयीन चिमुरडीवर झालेल्या अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अत्याचार घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण चामोर्शी तालुक्यातून प्रचंड जनआक्रोश निर्माण झाला आहे. या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि पीडित बालिकेला न्याय मिळवून देण्यासाठी चामोर्शीत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत एक ऐतिहासिक मूक मोर्चा काढण्यात आला. या घटनेने संपूर्ण गडचिरोली जिल्हा हादरून गेला असून, जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वपक्षीय नेते, विविध सामाजिक संघटना, महिला मंडळे आणि हजारो तरुण-तरुणी रस्त्यावर उतरले असून नराधम आरोपीला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी एकमुखी मागणी केली जात आहे.
या संवेदनशील प्रकरणावर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी तीव्र संताप व्यक्त करत घटनेचा जाहीर निषेध केला आहे. प्रशासनाला आणि सरकारला इशारा देताना ते म्हणाले, “चामोर्शीत घडलेली ही घटना अत्यंत निंदनीय आणि मानवतेला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. अशा विकृत नराधमांना समाजात जगण्याचा कोणताही अधिकार नाही. कायद्याने अशा गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन केले पाहिजे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून नराधम आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, जेणेकरून भविष्यात कोणाचीही अशी क्रूर कृत्य करण्याची हिंमत होणार नाही.” पीडित चिमुरडीला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही.
या अमानुष घटनेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी प्रशासनाकडे संबंधित नराधम आरोपीवर अत्यंत कडक कलमांखाली गुन्हा दाखल करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा. पीडितेला कायदेशीर व वैद्यकीय मदत जलद गतीने उपलब्ध करून देऊन, नराधम आरोपीला थेट फाशीची शिक्षा देण्यात यावी. प्रशासनाकडून पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक आणि मानसिक पाठबळ पुरवण्याची मागणी केली आहे.
या ऐतिहासिक मूक मोर्चामुळे संपूर्ण चामोर्शी परिसर स्तब्ध झाला असून, नराधमाला कठोर शिक्षा होईपर्यंत हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.



