
‘मुक्तीपथ‘ बैठकीत तहसीलदारांचे निर्देश
गडचिरोली : तालुक्यात दारू व तंबाखू नियंत्रणासाठी अधिक प्रभावीपणे मोहीम राबविण्याच्या उद्देशाने १५ जून रोजी तहसीलदार कार्यालयात ‘मुक्तीपथ’ तालुका समितीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. सदर बैठक तहसीलदार प्रशांत गड्डम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी तालुक्यात दारू आणि तंबाखूच्या वाढत्या प्रसाराला तातडीने आळा घालण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी एकत्रितपणे काम करून आपापला कृती कार्यक्रम राबवावा, असे कडक आदेश तहसीलदार गड्डम यांनी दिले.
या बैठकीला पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक भैसारे, मुक्तीपथचे तालुका संघटक धर्मेंद्र बोपचे, प्रेरक युवनाथ मेश्राम, अरुणा गोंनाडे, भूषण डोकरमारे आणि स्पार्क कार्यकर्ता धर्मेंद्र कुसराम यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान तहसीलदार प्रशांत गड्डम यांनी व्यसनाधीनतेच्या विरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. कार्यालयीन वेळेत जर एखादा शासकीय कर्मचारी दारूचे सेवन करताना अथवा तंबाखू खाताना आढळल्यास, त्याच्यावर कोणतीही गय न करता थेट कडक दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. प्रशासकीय कार्यालयांची प्रतिष्ठा, स्वच्छता आणि तेथील आरोग्याचे वातावरण राखण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
तालुक्यातील अवैध दारू आणि तंबाखू विक्रीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस विभागाकडून विशेष भरारी पथक तैनात करण्यात येणार आहे. पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांच्या थेट मार्गदर्शनात हे भरारी पथक शहर आणि ग्रामीण भागामध्ये आठवड्यातून किमान एकदा अचानक धाडी टाकून अवैध दारू व तंबाखू जप्त करण्याची धडक कारवाई करेल, असे या बैठकीत निश्चित करण्यात आले.
युवा पिढीला आणि शालेय विद्यार्थ्यांना व्यसनाधीनतेच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी ‘कोटपा’ कायद्याची अत्यंत कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. या नियमानुसार, तालुक्यातील कोणत्याही शाळेच्या १०० मीटर परिसरामध्ये असलेले तंबाखूजन्य पदार्थांचे विक्री केंद्र आणि पानठेले तात्काळ बंद करण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या (SMC) माध्यमातून लेखी पत्र देऊन पोलिसांच्या मदतीने कडक पावले उचलली जातील. याशिवाय तालुक्यातील व्यसनमुक्तीसाठी इतरही विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.



