क्राईमगोंदियाविदर्भ

निर्जनस्थळी चेहरा ठेचून ॲम्ब्युलन्स चालकाची निर्घृण हत्या

तीन दिवसांतील तिसऱ्या हत्याकांडामुळे जिल्हा हादरला, पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

गोंदिया : शहरातील सूर्याटोला रेल्वे ट्रॅकवर महिलेचा गळा चिरून खून केल्याची घटना ताजी असतानाच, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच मंगळवार, २३ जून रोजी आणखी एका थरारक हत्याकांडामुळे जिल्हा हादरून गेला आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कारंजा गावाजवळील एका मोकळ्या प्लॉटमध्ये एका ३५ वर्षीय तरुणाचा चेहरा पूर्णपणे ठेचलेल्या अवस्थेत विदारक मृतदेह आढळून आला. अनमोल ऊर्फ शंभू वसंत रंगारी (रा. भद्रुटोला, कारंजा) असे मृत तरुणाचे नाव असून तो व्यवसायाने ॲम्ब्युलन्स चालक होता. दोन दिवसांतील या तिसऱ्या खुनाच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सविस्तर वृत्त असे की, कारंजा येथील पतंगा चौक ते पोलीस मुख्यालय बायपास मार्गावरील किसान चौकाजवळ एका मोकळ्या भूखंडात (प्लॉट) नागरिकांना एक मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. मृत तरुणाने जीन्स पँट आणि चेक्सचा शर्ट परिधान केला होता, मात्र त्याचा चेहरा ओळखता येऊ नये इतक्या क्रूरपणे विद्रूप करण्यात आला होता. डोक्यावर आणि चेहऱ्यावर जड दगड किंवा धारदार शस्त्राने भीषण वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा आणि ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कसून शोध घेतला असता, घटनास्थळापासून काही अंतरावर अनमोलची मोटारसायकल बेवारस अवस्थेत आढळून आली. यावरून, आरोपी मृत अनमोलच्या परिचयातील असण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही बहाण्याने अनमोलला रात्रीच्या वेळी या निर्जनस्थळी बोलावून घेऊन त्याचा काटा काढण्यात आला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत अनमोल हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्याच्या हत्येच्या वृत्ताने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा केटीएस रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर हत्येची अचूक वेळ आणि वापरण्यात आलेल्या हत्याराबाबत अधिकृत माहिती समोर येईल. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अहेरकर यांच्या मार्गदर्शनात विशेष तपास पथके तयार करण्यात आली आहेत. जुने वाद, वैयक्तिक शत्रुत्व आणि आर्थिक किंवा कौटुंबिक बाबी लक्षात घेऊन तांत्रिक व वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. या हत्येचा उलगडा लवकरच करू, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गोंदिया शहर आणि परिसरात अलीकडच्या काळात खून, प्राणघातक हल्ले आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. अवघ्या तीन दिवसांत एकापाठोपाठ एक खुनाच्या तीन घटना घडल्याने सर्वसामान्य गोंदियाकरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. वाढत्या गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि सराईत गुन्हेगारांवर कठोर मोक्का किंवा तत्सम कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button