भंडाराविदर्भ

जिल्ह्यात विजेचा तांडव! तीन वेगवेगळ्या घटनांत दोन शेतकऱ्यांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

तुमसर आणि पवनी तालुक्यात काळाचा घाला ; खरीप हंगामाच्या तोंडावर बळीराजावर दुःखाचा डोंगर, शासकीय मदतीची मागणी

भंडारा : जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी ३ ते ४ वाजताच्या सुमारास निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळाला. अचानक बदललेल्या हवामानासह झालेल्या वीज कोसळण्याच्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनांमुळे खरीप हंगामाची पूर्वतयारी करणाऱ्या शेतकरी कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पीडित कुटुंबांना तात्काळ शासकीय मदत मिळण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

मृतांमध्ये शरद दवडू बुद्धे (वय ४५, रा. ढोरवाडा, ता. तुमसर) आणि श्रीकांत दिगांबर घावडे (वय ३८, रा. ब्रम्ही, ता. पवनी) यांचा समावेश आहे.

शुक्रवारी दिवसभर जिल्ह्यात कडक ऊन होते, मात्र सायंकाळी अचानक आकाशात काळे ढग जमा झाले आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. याच दरम्यान तुमसर तालुक्यातील ढोरवाडा-चारगाव शिवारात शरद दवडू बुद्धे हे आपल्या साळ्यासोबत शेतात ट्रॅक्टरने वखरणीचे काम करत होते. अचानक झालेल्या कडकडाटासह त्यांच्यावर वीज कोसळली आणि शरद बुद्धे यांचा जागीच करुण अंत झाला. या घटनेत त्यांच्यासोबत असलेले त्यांचे साळे महेश पांडुरंग फेंडर (वय ३५, रा. मंडणगाव, जि. भंडारा) हे गंभीर जखमी झाले. मृत शरद बुद्धे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.

वीज कोसळण्याची दुसरी घटना तुमसरजवळील शिवनी शिवारात घडली. खापा येथील रहिवासी असलेले तुकडू झिटोबा चौधरी (वय ७५) हे आपल्या शेतात मशागतीचे काम करत असताना अचानक त्यांच्यावर वीज पडली. या हल्ल्यात ते गंभीररित्या होरपळले व जखमी झाले. जखमी महेश फेंडर आणि तुकडू चौधरी या दोघांनाही तातडीने तुमसर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तिसरी अत्यंत हृदयद्रावक घटना पवनी तालुक्यातील ब्रह्मी (बाचेवाडी) येथे दुपारी २ ते ३ च्या सुमारास घडली. येथील शेतकरी श्रीकांत दिगांबर घावडे (वय ३८) यांच्या चुलत बहिणीचे त्याच संध्याकाळी उमरेड येथे लग्न होते. लग्नाला जाण्यापूर्वी शेतातील काम आटोपण्याच्या उद्देशाने श्रीकांत एका नातलगाला सोबत घेऊन शेतात धानाचे पन्हे (रोपटे) टाकायला गेले होते. काम सुरू असतानाच अचानक विजा कडाडल्या आणि वीज अंगावर पडल्याने श्रीकांत यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे विवाहाच्या आनंदाचे रूपांतर एका क्षणात तीव्र शोकाकुळ वातावरणात झाले. पवनी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, पवनी येथे पाठविला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button