‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’योजनेसाठी शासनाने ठरवून दिलेलीच कागदपत्रे द्यावी – जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले
महिलांनी घरबसल्या नारीशक्ती दूत ऍप वर नोंदणी करावी

गोंदिया : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून यामुळे ही योजना प्रभावी पद्धतीने लागू होण्यास मदत होईल असा विश्वास गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी व्यक्त केला. सोबतच शासनाने ठरवून दिलेल्या कागदपत्रांशिवाय अन्य कसलीही कागदपत्रे देऊ नये आणि शक्य असल्यास महिलांनी घरबसल्या नारीशक्ती दूत ऍप वर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले आहे.
राज्य शासनाने महत्त्वाचे बदल योजनेत केले होते. ज्यात ही योजना आता वय मर्यादा २१ ते ६५ च्या महिलांना लागू झाली आहे. कागदपत्रांमध्ये सुद्धा महत्त्वाचे बदल शासनाने केले ज्यात रहिवासी दाखला ऐवजी राशन कार्ड, वोटर आईडी, टीसी, जन्मदाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे. सोबतच जमिनीची अट संपूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरून लग्न होऊन महाराष्ट्रात आलेल्या माता भगिनींना आपल्या पतीचा जन्मदाखला, टीसी किंवा रहिवासी दाखला दाखवून योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्या महिलेकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना इनकम सर्टिफिकेट सादर करण्याची गरज नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला सोबतच कुटुंबातील वय वर्ष २१ ते ६५ च्या मधील अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेसाठी ऑनलाइन/ऑफलाइन अर्ज ३१ ऑगस्ट पर्यंत करता येईल. अर्ज करण्यास उशीर झाला असेल तरीही पैसे १ जुलै पासून मिळतील त्यामुळे महिलांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी सांगितले आहे. सोबतच नोंदणीसाठी विनाकारण लाभार्थ्यांना त्रास दिल्यास कारवाई सुद्धा करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.



