
प्रिती टेंभरे आणि दादा फुंडे यांना मानाचे कृषी पुरस्कार
गोंदिया : कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील दोन प्रगतीशील शेतकऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते मुंबईत गौरव करण्यात आला. एक जुलै ‘कृषी दिना’निमित्त आयोजित राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात गोंदियाच्या प्रिती ऋषी टेंभरे यांना ‘जिजामाता कृषीभूषण’ तर दादा रामाजी फुंडे यांना ‘उद्यान पंडीत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या यशाने गोंदिया जिल्ह्याचा कृषी क्षेत्रातील दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.
चुटिया (ता. गोंदिया) येथील प्रिती टेंभरे यांना सन २०२३ चा ‘जिजामाता कृषीभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सेंद्रिय शेतीचा ध्यास घेत त्यांनी गांडूळ खत आणि अझोला उत्पादन युनिटची यशस्वी उभारणी केली आहे. तसेच भात पिकासाठी दर्जेदार बियाण्यांची निवड, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि फळ-भाजीपाला लागवडीतील त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना या सर्वोच्च बहुमानाने गौरविले आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खैरी येथील दादा फुंडे यांना सन २०२३ च्या ‘उद्यान पंडीत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फलोत्पादन क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून आंबा, पेरू, चिकू आणि सीताफळ यांसारख्या फळपिकांची त्यांनी यशस्वी लागवड केली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिकेद्वारे’ दर्जेदार रोपांची निर्मिती करून त्यांनी सेंद्रिय शेती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे, ज्यामुळे त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे यांनी या दोन्ही शेतकऱ्यांचे अभिनंदन करत, ही कामगिरी इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. दरम्यान, २०२६ च्या कृषी पुरस्कारांसाठी प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांनी ३१ डिसेंबरपर्यंत कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.



