
तुमसर : तुमसर-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावरील बेदरकार टिप्पर वाहतुकीमुळे आणखी एका निष्पाप चिमुकल्याला गंभीर जखमी व्हावे लागल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास डोंगरला येथील स्मशानभूमीजवळ घडली. या अपघातात प्रज्ञान रुपेश राऊत (वय ३, रा. डोंगरला) हा चिमुकला गंभीर जखमी झाला असून, नशीब बलवत्तर असल्याने त्याचे वडील रुपेश राऊत आणि चिमुकल्याचा जीव
थोडक्यात बचावल्याने दुर्घटना टळली. रुपेश राऊत हे आपल्या तीन वर्षीय मुलगा प्रज्ञानला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीने डोंगरला येथून तुमसरकडे येत होते. दरम्यान, डोंगरला स्मशानभूमीजवळ भरधाव वेगाने आलेल्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण धडकेत प्रज्ञान गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करून जखमीला उपचारासाठी रवाना केले. स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील खड्डे तातडीने बुजविणे, टिप्परच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कारवाई करणे, तसेच महामार्गाच्या बांधकामाला विलंब न लावता त्वरित सुरुवात करण्याची मागणी केली आहे.



