
लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत कारवाई; कामचुकार कर्मचाऱ्यांमध्ये उडाली खळबळ
चंद्रपूर : मतदार यादीची पूर्वतयारी, पुनरावलोकन आणि दुरुस्तीच्या अत्यंत महत्त्वाच्या शासकीय कर्तव्यात निष्काळजीपणा व हलगर्जीपणा दाखवल्याप्रकरणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन शिक्षकांसह एकूण पाच कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे. या कडक आणि धडक कारवाईमुळे निवडणूक कामात टाळाटाळ करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये मुरलीधर बागला हायस्कूलचे सहायक शिक्षक आर.बी. येसांबरे, चंद्रपूर मनपा शाळेतील सहायक शिक्षक आनंद गेडाम, वेकोली क्षेत्रीय मुख्यालयातील कर्मचारी सोनू ढुमणे, किरण रामटेके आणि मनोज शेंडे यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी ‘लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५०’ च्या कलम १३ (सीसी) आणि ‘महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम’ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून ही निलंबनाची कारवाई केली आहे. निवडणूक कर्तव्यात कसूर केल्यामुळे या पाचही कर्मचाऱ्यांविरुद्ध आता रीतसर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
निलंबनाच्या कालावधीत या पाचही कर्मचाऱ्यांना कोणतीही खाजगी नोकरी स्वीकारता येणार नाही अथवा कोणताही खाजगी व्यवसाय किंवा धंदा करता येणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात स्पष्टपणे बजावले आहे. निवडणूक कामाशी जोडलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोपवलेली जबाबदारी गांभीर्याने घेऊन दिलेल्या मुदतीत मोहीम पूर्ण करावी, असे कडक निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.



