गोंदियाविदर्भ

विशेष लोकअदालतीत चेक बाउन्सची २४ प्रकरणे तडजोडीने निकाली; ४६.४४ लाखांची वसुली

जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या हस्ते उद्घाटन; पक्षकारांना मानसिक व आर्थिक त्रासातून मोठा दिलासा

गोंदिया : वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचाराने व सामंजस्याने तात्काळ निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार गोंदिया जिल्हा न्यायालयात ‘विशेष लोकअदालती’चे आयोजन करण्यात आले होते. तडजोड पात्र ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अ‍ॅक्ट’ (कलम १३८ – चेक बाउंस) अंतर्गत प्रलंबित व पूर्व न्यायप्रविष्ट प्रकरणांसाठी १८ जुलै २०२६ रोजी आयोजित या विशेष लोकअदालतीत २४ प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला असून, त्या माध्यमातून तब्बल ४६ लाख ४४ हजार ४९७ रुपयांची वसुली झाली आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे आणि प्राधिकरणाचे सचिव एन. के. वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय गोंदिया तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये या विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व न्यायिक अधिकारी, वकील, कर्मचारी व पक्षकारांच्या उपस्थितीत प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांच्या हस्ते लोकअदालतीचे उद्घाटन पार पडले. या वेळी बोलताना त्यांनी लोकअदालतीचे महत्त्व व फायदे स्पष्ट केले, तर सचिव एन. के. वाळके यांनी पक्षकारांना तडजोडीच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्याचे आवाहन केले.

या विशेष लोकअदालतीसमोर कलम १३८ अंतर्गत न्यायालयात प्रलंबित असलेली एकूण ९१५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २४ प्रकरणे दोन्ही बाजूंच्या सहमतीने व सामंजस्याने यशस्वीरीत्या निकाली काढण्यात आली. यामध्ये एकूण ₹४६,४४,४९७/- (छेचाळीस लाख चव्वेचाळीस हजार चारशे सत्याण्णव रुपये) इतक्या रकमेची तडजोड व वसुली झाली.

या लोकअदालतीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बँक रिकव्हरीशी संबंधित प्रकरणांतील ज्या थकबाकीदारांनी तडजोडीनुसार थकबाकीची पूर्ण रक्कम संबंधित बँकेत किंवा विभागात जमा केली, त्यांची न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे कायमची बंद करण्यात आली. यामुळे पक्षकारांचा भविष्यातील न्यायालयीन खर्च, वेळ आणि मानसिक त्रास वाचला असून अनेक पक्षकारांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

सदर प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश जी. एस. शेगांवकर तसेच पॅनेलवरील वकील ॲड. स्मिता दखने यांनी मध्यस्थ म्हणून महत्त्वपूर्ण सहकार्य केले. या विशेष लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी गोंदिया जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयांतील सर्व अधिकारी व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button