
नागपूर व वर्धा जिल्ह्यांतील विकासकामांचा उच्चस्तरीय आढावा; एडीबी योजनेतील ‘रिंग मेन युनिट’ उभारणीला प्राधान्य
नागपूर : महावितरणतर्फे नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांमध्ये भौतिक आणि आर्थिक प्रगतीचा योग्य समतोल राखण्याचे कडक निर्देश महावितरणचे संचालक (प्रकल्प) सचिन तालेवार यांनी दिले. नागपूर परिमंडळातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी ‘विद्युत भवन’ येथील प्रशासकीय सभागृहात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते.
विद्युत यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी सुरू असलेल्या वाहिनी विलगीकरणाची (Feeder Separation) कामे अधिक वेगाने पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार एजन्सींच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नियमित बैठका घेण्याचे आदेश त्यांनी दिले. कामादरम्यान ‘राईट ऑफ वे’ (Right of Way) किंवा अन्य तांत्रिक अडचणी उद्भवल्यास स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनाशी तातडीने समन्वय साधून तोडगा काढावा. तसेच कंत्राटदार एजन्सीजच्या अडीअडचणी समजून घेत त्यांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.
नागपूर जिल्ह्यात आशिया विकास बँकेच्या (ADB) अर्थसहाय्यातून पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी नवीन ‘रिंग मेन युनिट’ उभारणीच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. ही सर्व कामे विहित मुदतीत व उच्च गुणवत्तेची असावीत, याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीत इतर प्रलंबित योजनांचा आढावा घेताना नागपूर परिमंडळात वीज गळती प्रभावीपणे कमी करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या योजनेतील सर्व कामे यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच शेतीला दिवसा वीज पुरवणार्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ मधील दोन्ही प्रस्तावित उपकेंद्रांची कामे याच चालू महिन्यात पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. नवीन उपकेंद्रांसाठी आवश्यक जमिनीचा ताबा लवकरात लवकर मिळवण्यासाठी संबंधित शासकीय विभागांशी सतत पाठपुरावा करण्याचे निर्देशही देण्यात आले.
या उच्चस्तरीय आढावा बैठकीला महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक, अधीक्षक अभियंता (नागपूर प्रादेशिक) अमित परांजपे, अधीक्षक अभियंता (नागपूर ग्रामीण) संजय वाकडे, अधीक्षक अभियंता (नागपूर शहर) प्रफुल्ल लांडे, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) दिपाली माडेलवार आणि शहरातील सर्व कार्यकारी अभियंता प्रत्यक्ष उपस्थित होते. तर वर्धा येथील अधीक्षक अभियंता स्मिता पारखी व तेथील कार्यकारी अभियंता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) सहभागी झाले होते.



