गोंदियाविदर्भ

रानडुकरांच्या हल्ल्यात ९ शेतकरी गंभीर जखमी

मशागतीची कामे करताना अचानक केला हल्ला; जखमींवर गोंदिया व गोरेगाव येथे उपचार सुरू; वनविभागाच्या कारभारावर ग्रामस्थ संतप्त

गोंदिया : शेतात नियमित मशागतीची कामे करत असलेल्या शेतकऱ्यांवर रानडुकरांच्या कळपाने प्राणघातक हल्ला करून तब्बल ९ शेतकऱ्यांना गंभीर जखमी केल्याची थरारक घटना गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी आणि पालेवाडा शिवारात बुधवारी (दि. २९ जुलै) सकाळी घडली. या सलग हल्ल्यांमुळे संपूर्ण परिसरात तीव्र घबराट पसरली असून शेतकऱ्यांच्या जिवाचा व सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कलपाथरी येथील शेतकरी राधेश्याम राऊत यांच्या शेतात काम सुरू असताना झुडपात लपलेल्या रानडुंकराने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात राधेश्याम शेगो राऊत (वय ४८), प्रदीप दाजीबा राऊत (वय ३५), जितेंद्र चैत्राम गावराने (वय ३०) हे तिघे गंभीर जखमी झाले. शेतकऱ्यांच्या आरडाओरडीनंतर परिसरातील इतर शेतकऱ्यांनी धाव घेत जखमींची रानडुकराच्या तावडीतून सुटका केली. राधेश्याम राऊत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना प्रथमोपचारानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय, गोंदिया येथे हलवण्यात आले आहे.

पहिली घटना घडल्यानंतर तासाभरातच, म्हणजेच सकाळी ९ वाजेच्या सुमारास जवळच असलेल्या पालेवाडा येथील शेतशिवारात रानडुकराने पुन्हा धुमाकूळ घातला. यात उस्मानभाई केशवराव राखडे (वय ५०), लालाजी धोमा बागडे (वय ४५), धीरज लालाजी बागडे (वय २२) यांच्यासह इतर शेतकरी जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच काँग्रेस तालुका अध्यक्ष जगदीश येरोला, जि.प. अर्थ व बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत, जि.प. सदस्य शशीभाऊ भगत आणि गोरेगाव पं.स. चे माजी सभापती मनोज बोपचे यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी शेतकऱ्यांची विचारपूस केली. वनविभागाने तात्काळ प्रभावी उपाययोजना करून बाधितांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

गोरेगाव तालुक्यातील अनेक गावांत रानडुकरांकडून धान, मका पिकांचे अतोनात नुकसान केले जात आहे. आता थेट शेतकऱ्यांवर हल्ले होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे. बाधितांना त्वरित आर्थिक मदत देऊन परिसरात वनविभागाने गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

“घटनेची माहिती मिळताच वनविभागाने आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे. जखमींवर उपचार सुरू असून, शासकीय नियमानुसार पंचनामा करून पात्र आर्थिक मदत तातडीने मंजूर केली जाईल.”

— स्नेहल आखरे (वनपरिक्षेत्र अधिकारी, आमगाव)

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button