
चंद्रपूर : वनविकास महामंडळाच्या मामला वनपरिक्षेत्र आगारातून वनोपजाची अवैध विक्री केल्याचा ठपका ठेवत वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील आत्राम यांच्यासह सहा कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. या कारवाईने वनविकास महामंडळात खळबळ उडाली आहे. वनपाल व्ही. एस. आत्राम, एन. एम. बोराडे, यू., पी. डाखोरे, महिला वनरक्षक पी. डी. चुनारकर व वनमजूर के. एच. गेडाम अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. प्रादेशिक व्यवस्थापक सुमित कुमार यांनी मंगळवारी (दि. ९) या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला.
चंद्रपूर वन प्रकल्प विभागात वनविकास महामंडळाद्वारे झाडांच्या कटाईनंतर त्यांची विक्री केली जाते. यातून शासनाला महसूल मिळतो. महामंडळाच्या पश्चिम चांदा वन प्रकल्पातील ४१२ क्रमांकाचे वनोपज आगार मामला वनपरिक्षेत्रातील घंटाचौकी गावाजवळ आहे. या आगारात कटाई केलेला वनोपज गोळा केला जातो. त्यानंतर वनोपजावर क्रमांक टाकून विक्री करण्यात येते. मात्र संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जादा वृक्षांची कत्तल करून आगारात आणले. त्याठिकाणी मालाची नोंद न घेता परस्पर विक्री केली. यासंदर्भात तक्रार झाल्यानंतर चौकशी करण्यात आली.
प्रथमदर्शनी चौकशीत सहा कर्मचारी दोषी आढळले. त्यामुळे प्रादेशिक व्यवस्थापक सुमित कुमार यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील आत्राम, वनपाल व्ही. एस. आत्राम, एन. एम. बोराडे, यू., पी. डाखोरे, महिला वनरक्षक पी. डी. चुनारकर व वनमजूर गेडाम यांना तडकाफडकी निलंबित केले.



