
गडचिरोली : दोन व्यक्तींनी एका महिलेच्या घरात शिरून सामानाची तोडफोड केल्याची घटना शहरातील रामनगर प्रभागात सोमवारी (दि. 15) रात्री 9 वाजताच्या दरम्यान घडली. सदर व्यक्तींनी महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन अश्लील शब्दात शिवीगाळ केली. महिलेच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांनी दोन आरोपींविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये शहरातील रामनगर येथील राहुल मेटे आणि सेहवाज यांचा समावेश आहे.
सोमवारी रात्री रामनगर येथील प्रभाग क्रमांक 19 मध्ये राहणारी सुष्मिता राजेंद्र लाटेलवार (वय 40) या कुटुंबासह घरात होत्या. दरम्यान, याच प्रभागातील रहिवासी राहुल मेटे व सेहवाज नावाचे दोन तरुण लाटेलवार यांच्या घराच्या आवारात शिरले. यावेळी त्यांनी घराबाहेर ठेवलेल्या विविध साहित्यांची तसेच 2 दुचाकींची तोडफोड केली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी लाटेलवार कुटुंबीयांना मारहाण करून अश्लील शब्दात शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, शेजाऱ्यांनी लाटेलवार कुटुंबाला वाचविण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. जुन्या वादातून दोन्ही आरोपींनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. याप्रकरणी पीडित महिला सुष्मिता लाटेलवार यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरूद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 296, 115, 351 (2) आणि 3 (5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार दिलीप खोब्रागडे करत आहेत. पीडित महिला सुष्मिता लाटेलवार यांनी आरोपींवर कठोर कारवाई आणि कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.



