जुन्या पैशाच्या वादातून ‘त्या’ युवतीची हत्या ; आरोपीची कबुली
कुरखेडा येथे संशयास्पद स्थितीत आढळला होता युवतीचा मृतदेह

कुरखेडा : येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात २४ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास एका युवतीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तीव्र गतीने तपास चक्रे फिरवत संदिग्ध आरोपीस ताब्यात घेत कसून चौकशी केली असता आरोपी इकराम सलाम शेख (वय ३०) याने जुन्या पैशाच्या वादातून ज्योती उर्फ चांदनी मसाजी मेश्राम हिचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली आहे. आरोपी विरोधात भा. न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
शनिवारी सकाळी येथील जिल्हा परिषद आवारात क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या युवकांना भिंतीला लागून युवतीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळावर बघ्यांनी एकच गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले व ठाणेदार महेंद्र वाघ यांनी ताफ्यासह घटनास्थळकडे धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन युवतीचा शव ताब्यात घेवून येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला होता. मृतकाच्या शरीरावर कुठलीही जखम किंवा मार लागल्याच्या खुणा नव्हत्या त्यामुळे प्राथमिक वैद्यकीय तपासात युवतीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे सांगता येत नसल्याचे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते. आता पोस्टमार्टमद्वारे केलेल्या तपासणीत सदर युवतीची हत्त्या झाली असल्याचे समोर आले असून तिचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. रमेश हे सकाळीच कुरखेडा येथे दाखल झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात कुरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र वाघ घटनेचा पुढील तपास करीत आहेत.



