
गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील अतिदुर्गम वेंगनूर येथील आरोग्य उपकेंद्रास रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे.
मुलचेरा तालुक्यातील वेंगनूर येथे राज्य सरकारने आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम केले आहे. सदर उपकेंद्राअंतर्गत चार गावे येत असून सदर गाव व त्या अंतर्गत येत असलेली गावे ही अतिशय दुर्गम भागात मोडतात. गावातील ग्रामस्थ रोजगाराच्या अभावाने अतिशय गरिबीचे जीवन जगत आहेत.
वेंगनूर गावापासून मुख्य गाव रेगडीचे अंतर 14 किमी असून सदर रस्ता फारच खराब झाला असल्याने ग्रामस्थांना रस्त्यावरून आवागमन करणे फारच त्रासाचे व जोखमीचे झाले आहे. वेंगनुर येथील आरोग्य उपकेंद्र नवीन असून व उपचार करण्याकरिता पाहिजे त्या प्रमाणात उपकेंद्रात सोयी सुविधा नसल्याने गर्भवती महिला व जोखमीच्या रुग्णांवर तात्काळ उपचार करणे शक्य नसल्याने गर्भवती माता किंवा जोखमीच्या रुग्णास वेंगनुर येथून आसपासच्या वैद्यकीय केंद्रात, जिल्हा रुग्णालयात रेफर करावे लागते. गावात चारचाकी वाहन नसल्याने खाजगी वाहने मिळणे कठीण आहे. या गावात मोबाईल नेटवर्क सुद्धा नसल्याने अशा परिस्थितीत गर्भवती माता व जोखमीच्या रुग्णास वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने धोका होत आहे व अनेक रुग्ण आजपर्यंत दगावले आहेत. त्यामुळे आरोग्य उपकेंद्र वेंगनुरकरिता राज्य सरकारने रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालय येथील मुख्यमंत्री सचिवालय येथे नायब तहसीलदार गवारे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
यावेळी मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे, राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेंद्र विश्वास, नगरसेवक आशिष पिपरे, मानवाधिकार संघटना विदर्भ अध्यक्ष जावेद अली शेख, मानवाधिकार संघटना कार्यकारी जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, मानवाधिकार संघटना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, भामरागड तालुका मानवाधिकार संघटना अध्यक्ष भीमराव वनकर व मूलचेराचे मानवाधिकार संघटना पदाधिकारी सत्तू मंडल उपस्थित होते.



