
जिल्ह्यातील एकूण 22 केंद्रांचा समावेश
भंडारा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून राज्यातील एक हजार आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे दूरदृश्यप्रणालीद्वारे 20 सप्टेंबर रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे.
कौशल्य विकास संकल्पनेचा अधिकाधिक लाभ युवक-युवतींना व्हावा या दृष्टीकोनातून नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. यामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी अशा एकूण 22 महाविद्यालयांमधील केंद्रांचा समावेश आहे.
वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या प्रांगणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विश्वकर्मा कौशल्य योजनेच्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. यावेळी कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यातील १ हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे.
या धोरणाच्या अंमलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच, युवक-युवतींना कौशल्य विकासाची संधी महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचे उद्घाटन व यशस्वी महिला स्टार्टअप्सचा सन्मान तसेच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन या दोन महत्वाकांक्षी योजनांचा समावेश या कार्यक्रमात राहणार आहे.
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रात जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा. तसेच 20 सप्टेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला त्या-त्या महाविद्यालयांच्या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवारांनी उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी केले आहे.



