पाच बळी घेणारी वाघीण अखेर जेरबंद

मूल : चंद्रपूर वनविभागाअतंर्गत चिचपल्ली परिक्षेत्रातील जानाळा, कांतापेठ, चिरोली, कवडपेठ, चिचाळा, ताडाळा परिसरात मानव-वन्यजीव संघर्षांच्या घटना गत काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर घडल्या. चार ते पाच गुराख्यांचा वाघिणीने बळी घेतला. या टी-83 वाघिणीला शनिवारी (दि. 28) पहाटे 5.30 वाजताच्या सुमारास जेरबंद करण्यात यश आले.
मानव वन्यजीव संघर्ष व गुरख्यांचे बळी लक्षात घेता मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त, डॉ. जितेंद्र रामगावकर यांचे सूचनेनुसार आनंद रेड्डी, उपसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर चंद्रपूर व प्रशांत खाडे, विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर, तसेच व्ही. एस. तरसे, सहाय्यक वनसरंक्षक, चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर वाटोरे, सहाय्यक वनसंरक्षक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात चिचपल्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या जानाळा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 717 मध्ये वाघिणीला प्रियंका आर. वेलमे, वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली (प्रादे) तसेच राहुल कारेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, बफर मूल आणि डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, राकेश आहुजा, बायोलॉजिस्ट ब्रम्हपुरी यांच्या नेतृत्वात अजय मराठे, शार्प शूटर यांनी यशस्वीरित्या बेशुध्द करुन वाघिणीला जेरबंद करण्यांत आले.
मोहिमेत महादवाडीचे क्षेत्र सहा. पी. डी. खनके, केळझरचे क्षेत्र सहा. एन. डब्ल्यू. पडवे, मूलचे क्षेत्र सहा. एम. जे. मस्के, जानाळाचे वनरक्षक राकेश गुरनुले, मूलचे वनरक्षक एस. आर. ठाकूर, चिचाळाच्या वनरक्षक शीतल व्याहाडकर, दहेगावच्या वनरक्षक शुभांगी गुरनुले, चिरोलीच्या वनरक्षक सविता गेडाम, महादवाडीचे वनरक्षक पवन येसांबरे, पिंपळखुटचे वनरक्षक जि. जे. दिवठे, गिरबिलीचे वनरक्षक एस. एस. बावणे, चंद्रपूर येथील आरआरटी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे विकास ताजणे, योगेश लाकडे, प्रफुल वाडगुरे, गुणांक ढोरे, दीपेश टेभूर्णे, वसीम शेख, अमोर कोरपे, अक्षय दांडेकर यांनी सहकार्य केले.



