8 लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवादी दाम्पत्याचे आत्मसमर्पण

गडचिरोली : आठ लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल नक्षलवादी दाम्पत्याने १९ ऑक्टोबर रोजी गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केले. एरीया कमिटी मेंबर (एसीएम) प्रेस टिम (ओडिशा) असिन राजाराम कुमार ऊर्फ अनिल ऊर्फ गगनदीप ऊर्फ निशांत ऊर्फ सुशांत (वय 37) मुळ पत्ता रा. मंडीकला ता. नरवाना जि. जिंद (हरियाणा) व सध्याचा पत्ता रा. सुन्नी ता. सुन्नी जि. शिमला (हिमाचल प्रदेश) व त्याची पत्नी दलम सदस्य प्रेस टिम (ओडिशा) अंजू सुळया जाळे ऊर्फ सोनिया ऊर्फ जनिता (वय 28) रा. गुरेकसा, ता. धानोरा व सध्याचा पत्ता रा. सुन्नी ता. सुन्नी जि. शिमला (हिमाचल प्रदेश) असे या जहाल नक्षलवादी दाम्पत्याचे नाव आहे.
शालेय जीवनात बालदस्ता या संघटनेमध्ये असिन ची विशेष रुची होती. तो जिंद (हरियाणा) येथे असतांना जागृत छात्र मोर्चामध्ये राज्य समिती सदस्य म्हणून त्याने उत्तर प्रादेशिक ब्युरोसाठी काम केले. 2006 मध्ये माड एरीया प्रेस टिममध्ये भरती होऊन सन 2011 पर्यंत सदस्य पदावर तो कार्यरत होता. 2011 मध्ये प्रेस टिममधून कंपनी 10 मध्ये एसीएम पदावर त्याची बदली झाली. 2013 मध्ये कंपनी 10 मधून प्रेस टिम (ओडिशा) मध्ये बदली होऊन 2018 पर्यंत कार्यरत होता. 2018 ते आजपावेतो हिमाचल प्रदेश राज्यामध्ये राहुन उदरनिर्वाह करत होता. त्याच्यावर २ चकमकीचे गुन्हे दाखल आहेत.
अंजू जाळे हीने 2007 मध्ये टिपागड दलममध्ये कमांडर दिनकर याची मदतनीस म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 2008 मध्ये राही दलममध्ये बदली होऊन जून 2009 पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होती. 2010 ते 2012 पर्यंत माड एरीयातील मौजा घमंडी (छ.ग.) गावात जनताना सरकारच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम तिने केले. 2012 मध्ये कंपनी क्र. 10 मध्ये बदली होऊन सन 2013 पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होती. 2013 ते 2018 पर्यंत ओडिशा राज्यात बदली होऊन प्रेस टिममध्ये हिंदी आणि गोंडी भाषेचे टंकलेखक म्हणुन काम केले. 2018 ते आजपावेतो हिमाचल प्रदेश राज्यामध्ये राहुन उदरनिर्वाह करत होती. तिच्यावर २ चकमकीचे गुन्हे दाखल आहेत.
महाराष्ट्र शासनाने असिन राजाराम कुमार 06 लाख तर अंजू जाळे हिचेवर 02 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन असिन याला 05 लाख तर अंजू हिला 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे. पती-पत्नी असलेले नक्षलवादी सदस्य यांनी आत्मसमर्पण केल्यास एकत्रित अतिरिक्त मदत म्हणून 1.5 लाख रुपये असे एकुण 11 लाख रुपयांचे बक्षिस शासनाकडुन जाहिर करण्यात आले आहे.
पोलिसांनी माओवादविरोधी अभियान प्रभावीपणे राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची संधी दिल्याने २०२२ ते २०२४ या दरम्यान २९ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, राज्य राखीव दलाचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, रेंज फिल्ड टिम उप-कमांडंट सुमीत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पाडली.



