
भंडारा : तरुणांमध्ये आकर्षणाचा विषय असलेल्या द ग्रेट खलीच्या रोडशो सह युवकांच्या बाईक रॅली ने आज शहरातील वातावरण बदलून गेले होते. महायुतीचे उमेदवार आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचारासाठी खली यांच्या रोड-शोचे आयोजन करण्यात आले होते. तरुणांचा प्रचंड उत्साह यानिमित्ताने दिसून आला.
20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी महायुतीचे उमेदवार आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचारासाठी द ग्रेट खली याच्या रोडशोच्या आयोजन भंडाऱ्यासह ग्रामीण भागात करण्यात आले होते. तरुणांचे आकर्षण असलेल्या खलीला पाहण्यासाठी रस्त्याच्या बाजूला तरुण तरुणींची प्रचंड गर्दी एकत्रित आली होती.
भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरून म्हणजेच खरबी येथून 1000 पेक्षा अधिक युवकांच्या मोटार सायकल रॅलीच्या माध्यमातून खली यांचे स्वागत करीता रोड शोला सुरुवात झाली. हजारो मोटार सायकल आणि त्यावर सहभागी तरुणांकडून दिल्या जाणाऱ्या नरेंद्र भोंडेकर आगे बढोच्या घोषणा गगनभेदी होत्या. वाहनावर सहभागी होत खली नागरिकांना अभिवादन करताना दिसत होता. खरबी येथून भंडारा शहरातील प्रमुख मार्गाने रोड-शो करण्यात आला. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. रोड-शोमुळे शहरातील वातावरण भगवामय झाल्याचे चित्र होते. महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्यासाठी सकारात्मक ठरण्याची चर्चा सुरू झाली होती.



