
गोंदिया : इतवारी ते बिलासपूर धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसच्या डबा क्रमांक एस- ६ च्या बाथरूममध्ये असलेल्या दुपट्टयाने हुकला गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. २३) सकाळी ६ वाजता उघडकीस आली. जगबंधू सिमहाजरी शाहू (२९, रा. वॉर्ड क्रमांक-२५ भिलाई, जि. दुर्ग-छत्तीसगड) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
जगबंधू शाहू हा शुक्रवारी (दि. २२) भिलाई येथील एका मित्राच्या लग्नाच्या आशीर्वाद समारंभात गेला होता. तिथून सरळ तो शिवनाथ एक्सप्रेसमध्ये बसला व गाडीतील डबा क्रमांक एस-६ च्या बाथरूममध्ये असलेल्या हुकला दुपट्टयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा १५ ते १६ तासांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले. मित्रांसोबत लग्नात गेलेल्या जगबंधूने लग्नातून सरळ शिवनाथ एक्सप्रेस का गाठली, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. तीच शिवनाथ एक्सप्रेस नागपूरवरून इंटरसिटी एक्सप्रेस होऊन परत येत असताना गोंदियापूर्वी एक प्रवासी महिला बाथरूमला गेली असता, तिला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. तिने इतर प्रवाशांना माहिती दिल्याने एकच गोंधळ उडाला. त्याचा मृतदेह येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. गोंदिया रेल्वे पोलिसांनी या घटनेसंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास सहायक फौजदार दयानंद निकोडे करीत आहेत.



