
अब्दुलटोलाजवळील घटना ; धान विक्री करून घरी जाताना झाला अपघात
देवरी : तालुक्यातील भागी येथे धानाची पोती सोडून मसूरभावडाकडे परत जाणारा ट्रॅक्टर चिचगड रोडवरील अब्दुलटोला गावाजवळ उलटल्याने ट्रॅक्टरवर बसून असलेल्या तरुणाचा ट्रॉलीच्या चाकात दबून जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.२८) मध्यरात्री घडली. नरेंद्र मुकेश कुंभरे (२२) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास परसोडीवरून ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५ एजी ७६३२ मध्ये धानाची पोती घेऊन देवरी जवळील ग्राम भागी येथे धान विक्री करण्यासाठी आले होते. धान विक्री करून झाल्यानंतर ते ट्रॅक्टर घरी मसूरभावडा येथे परत जात असताना देवरी चिचगड रस्त्यावरील ग्राम अब्दुलटोला जवळ मध्यरात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली उतरून ट्रॉली उलटली. यात नरेंद्र मुकेश कुंभरे यांचा ट्रॉलीच्या चाकाखाली दबून जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच देवरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतकाला देवरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले. पुढील तपास पोलिस हवालदार ज्ञानीराम करंजेकर करीत आहेत. या अपघाताची माहिती मिळताच आ. संजय पुराम यांनी मृतकाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.



