
पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आ. चरण वाघमारे प्रत्येक वॉर्डात जाऊन घेत आहेत समस्यांची माहिती
भंडारा : भंडारा शहरातील नागरी समस्यांकडे नगर परिषदेचे होत असलेले दुर्लक्ष पाहता, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता थेट नागरिकांच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे अभियान सुरू केले आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात १ ऑगस्टपासून शहरातील प्रत्येक वॉर्डात जाऊन नागरिकांच्या समस्यांची माहिती घेतली जात आहे. प्रशासनाने लवकरच या समस्यांचे निवारण न केल्यास, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.
यापूर्वी २४ जुलै रोजी चरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते आणि नागरिकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून नागरी समस्यांबाबत निवेदन दिले होते. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतरही पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता आणि सुरक्षा यांसारख्या मूलभूत समस्यांचे निवारण करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये नगर परिषदेच्या अनागोंदी कारभाराबद्दल तीव्र नाराजी आहे.
सध्या सुरू असलेल्या ‘गृहभेट’ अभियानात वाघमारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. तात्काळ निराकरणासाठी ते जागेवरूनच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून समस्या सोडवण्यास सांगत आहेत. येत्या काही दिवसांत प्रशासनाने या नागरी समस्या दूर न केल्यास, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगर परिषद आणि प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करेल, असा अंतिम इशारा देण्यात आला आहे.



