बेपत्ता दुचाकीस्वाराची निर्घृण हत्या? ; जंगलात आढळला रक्ताने माखलेला मृतदेह

अहेरी तालुक्यात खळबळ
अहेरी : तालुक्यातील नागोपल्ली येथील एक ४१ वर्षीय इसम रविवारपासून बेपत्ता असताना, सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जंगलात अत्यंत विदारक अवस्थेत आढळून आला. मृताच्या शरीरावरील जखमांचे स्वरूप पाहता ही हत्या असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.
नागोपल्ली येथील रहिवासी रविंद्र तंगडपल्लीवार (वय ४१) हे रविवारी दुपारी काही कामानिमित्त आपल्या दुचाकीवरून घराबाहेर पडले होते. मात्र, सायंकाळ होऊनही ते घरी परतले नाहीत. काळजीत पडलेल्या कुटुंबीयांनी त्यांचा मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र फोन बंद येत होता. रात्रभर नातेवाईक आणि मित्रमंडळींनी त्यांचा शोध घेतला, पण त्यांचा पत्ता लागला नाही.
सोमवारी सकाळी आलापल्लीपासून साधारण पाच किलोमीटर अंतरावर, नागामद्रिाजवळील जंगल परिसरात स्थानिकांना एक मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रविंद्र यांच्या डोक्यावर आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. हल्ल्याची भीषणता एवढी होती की, त्यांच्या एका हाताची बोटेही तुटलेली होती. घटनास्थळी दारूच्या बाटल्याही आढळून आल्याने, गुन्ह्यापूर्वी तिथे नेमके काय घडले असावे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
घटनेचे गांभीर्य ओळखून अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे आणि पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळाचा पंचनामा केला. ही नियोजित हत्या असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृताच्या शरीरावरील जखमा गंभीर असून प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचे स्पष्ट होत आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.
रविंद्र तंगडपल्लीवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाच्या अशा निर्घृण हत्येमुळे तंगडपल्लीवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे आलापल्ली आणि नागोपल्ली परिसरात नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.



