
शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेनुसार ३९ केंद्रांवर खरेदी सुरू; शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
गडचिरोली : जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२४-२५ अंतर्गत शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेनुसार धान खरेदीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ३९ अधिकृत खरेदी केंद्रांवर ही प्रक्रिया सुरू असून, शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २३०० रुपये असा शासनाने निश्चित केलेला दर दिला जात आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सोय व्हावी याकरिता विविध तालुक्यांमध्ये निश्चित करण्यात आलेली खरेदी केंद्रे कुरखेडा तालुका: १७ खरेदी केंद्रे, कोरची तालुका: ४ खरेदी केंद्रे, आरमोरी तालुका: ३ खरेदी केंद्रे, वडसा तालुका: १ खरेदी केंद्र, गडचिरोली तालुका: ३ खरेदी केंद्रे, धानोरा तालुका: २ खरेदी केंद्रे, सिरोंचा तालुका: ९ खरेदी केंद्रे
या सर्व खरेदी केंद्रांचे संचालन आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि महामंडळाच्या माध्यमातून केले जात आहे, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या धान पिकाची विक्री करणे सुलभ झाले आहे.
प्रादेशिक व्यवस्थापक, गडचिरोली यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की, त्यांनी शासनाच्या आधारभूत किंमत योजनेचा लाभ घ्यावा. आपल्या जवळच्या अधिकृत खरेदी केंद्रावर विहित नियम व अटींचे पालन करून धान विक्री करावी आणि अधिकृत पावती घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. शासनाच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या धान पिकाला योग्य भाव मिळण्यास मदत होणार आहे.



