
गोंदिया : जागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून ८ मे रोजी या आजाराबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. थॅलेसेमियाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून या आजाराचा नायनाट करणे आणि जगाला थॅलेसेमियामुक्त करणे हा या जनजागृतीचा मुख्य उद्देश आहे. आरोग्य प्रशासनातर्फे हेमेटोलॉजी सेलच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी थॅलेसेमियाची वेळीच तपासणी करण्याचे आणि योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
डॉ. हुबेकर यांनी सांगितले की, जर तपासणीत कोणी थॅलेसेमिया मायनर आढळल्यास त्यांनी दोन गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. प्रथम म्हणजे, विवाह करताना आपल्या जोडीदाराची थॅलेसेमिया चाचणी नक्की करून घ्यावी आणि दुसरे म्हणजे, डॉक्टरांकडे गेल्यावर आपण थॅलेसेमिया मायनर असल्याचे त्यांना सांगावे. कारण थॅलेसेमिया मायनर असलेल्या व्यक्तींमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लोह दिल्यावरही विशेष फायदा होत नाही. अनेकदा डॉक्टरांना जेव्हा लोह देऊनही रुग्णाचे हिमोग्लोबिन वाढत नाही, तेव्हा ते थॅलेसेमियाची तपासणी करण्याचा सल्ला देतात. तसेच, गर्भवती महिलांची गर्भधारणेच्या सुरुवातीच्या आठवड्यातच ही तपासणी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
थॅलेसेमियाची तपासणी कधी करावी याबद्दल माहिती देताना डॉ. हुबेकर म्हणाल्या, “प्रत्येक नवजात बालकाची जन्मानंतर रक्तगट तपासणीसोबतच थॅलेसेमियाची चाचणी व्हायला हवी. काही कारणास्तव त्यावेळी तपासणी झाली नाही, तर महाविद्यालयीन प्रवेशावेळी ही तपासणी अनिवार्य करावी, त्याशिवाय प्रवेश देऊ नये. तरीही चाचणी झाली नसेल, तर हल्ली लग्नापूर्वी जसे प्री-वेडिंग शूट केले जाते, त्याऐवजी किंवा त्यासोबत प्री-वेडिंग समुपदेशन करून घ्यावे.”
आपले थॅलेसेमिया स्टेटस समजून घेणे महत्त्वाचे आहे. तपासणीतून आपण नॉर्मल आहात की थॅलेसेमिया मायनर आहात हे कळते. थॅलेसेमिया मायनर हा कोणताही आजार नसून, आपण केवळ या गुणसूत्राचे वाहक आहात. त्यामुळे, केवळ लग्न कुंडली जुळवून विवाह करण्याऐवजी आरोग्य कुंडली तपासणी करून विवाह जुळवा, असे आवाहन डॉ. हुबेकर यांनी केले आहे.
गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात थॅलेसेमिया डे केअर सेंटरमध्ये मोफत सुविधा उपलब्ध आहे. तसेच, थॅलेसेमियाग्रस्त बालकांना मेडिकल कॉलेजच्या रक्तपेढीतून मोफत रक्त संक्रमण सुविधा पुरविली जाते. थॅलेसेमिया रुग्णांना दिव्यांग दर्जा असल्याने, त्यांना जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग UDID कार्ड ओळखपत्र सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी दिली.



