क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

८ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

दोघांपैकी एकाचा गेल्या 30 वर्षापासुन माओवादी संघटनेत होता सक्रिय सहभाग 

गडचिरोली : शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षलवाद्यांसह अनेक जहाल नक्षलवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित नक्षल्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 680 नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. 20 डिसेंबर रोजी जहाल नक्षलवादी रामसु दुर्गु पोयाम ऊर्फ नरसिंग (ए.सी.एम) (वय 55), रा. गट्टानेली, ता. धानोरा व रमेश शामु कुंजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित (दलम सदस्य) (वय 25) रा. वेडमेट्टा, जि. नारायणपूर (छ.ग.) यांनी गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले.

रामसु पोयाम हा सन 1992 मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन 1995 पर्यंत कार्यरत होता. 1995 मध्ये काकुर दलममध्ये राहुन सन 1996 पर्यंत माओवाद्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना सुरक्षा देण्याचे काम करीत होता. 1996 ते 1998 पर्यंत पुन्हा टिपागड दलममध्ये कार्यरत होता. 1998 मध्ये माड एरीया (छ.ग.) येथे बदली होऊन सप्लाय टिममध्ये 2001 पर्यंत कार्यरत होता. 2001 ते 2002 पर्यंत प्रेस टिममध्ये प्रशिक्षणाकरीता कार्यरत होता. 2002 मध्ये एरीया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर पदोन्नती होऊन नक्षलवाद्यांसाठी कृषी कामाकरीता कोडतामर्का गाव परिसरात सन 2005 पर्यंत कार्यरत होता. 2005 ते 2010 या कालावधीत डुमनार, फरसगाव व कोडेनार या गावांमध्ये माओवाद्यांसाठी कृषीची कामे करत होता. 2010 ते आजपावेतो कुतुल आणि नेलनार दलममध्ये एरीया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर कार्यरत होता. त्याच्यावर एकुण 12 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 06 चकमक, 05 खुन व 01 दरोडा इ. गुन्ह्यांचा समावेश आहे.

रमेश कुंजाम हा 2019 मध्ये मिलिशिया म्हणून माओवाद्यांची कामे करत होता. 2020 मध्ये चेतना नाट¬ मंच (सिएनएम) येथे सदस्य पदावर भरती होऊन कार्यरत. सन 2021 मध्ये कुतुल दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपावेतो कार्यरत. हिंसक घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याची पडताळणी करणे सुरु आहे.

महाराष्ट्र शासनाने रामसु पोयाम याच्यावर 06 लाख रूपयाचे तर रमेश कुंजाम याच्यावर 02 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रामसु पोयाम याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे. तर रमेश कुंजाम याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी फक्त यावर्षात 20 जहाल नक्षलवाद्यांसह सन 2022 ते आतापर्यंत एकुण 33 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्रभारी समादेशक, 37 बटा. सिआरपीएफ सुजीत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button