
देसाईगंज : नूतन शिक्षण प्रसारक मंडळ, देसाईगंज द्वारा संचालित आदर्श कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शैक्षणिक सत्र २०२४-२५ मधील विद्यापीठ परीक्षेत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा शैक्षणिक गुणवत्ता गौरव व पालक सत्कार समारंभ शनिवार. २० सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या समारंभात माजी आमदार कृष्णा गजबे यांनी बक्षिस वितरण करून विद्यार्थ्यांचे व पालकांचे शाल, श्रीफळ व पुस्तके देऊन सन्मान करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.
आपल्या भाषणात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे मा. आमदार कृष्णा गजबे म्हणाले की, “यश मिळवण्यासाठी केवळ विद्यार्थ्यांचा चिकाटीचा अभ्यास नव्हे; तर त्यामागे पालकांचे अथक परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि संस्थेच्या प्रोत्साहनाचा मोठा वाटा असतो. शिक्षण हाच समाजपरिवर्तनाचा मुख्य पाया असून विद्यार्थी या यशावर न थांबता आणखी मोठी उद्दिष्टे गाठतील, अशी अपेक्षा आहे.”
समारंभात शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांची यादी जाहीर करून त्यांचा परिचय करून देण्यात आला. या गुणवंत विद्यार्थ्यांची नावे व यशाची माहिती प्रा. अमोल बोरकर यांनी वाचून दाखवली, तेव्हा सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटात वातावरण भारावून गेले. विद्यार्थ्यांच्या यशाचा सत्कार करताना त्यांचे व पालकांचे शाल, श्रीफळ व पुस्तके देऊन गौरव करण्यात आला.
समारंभाचे अध्यक्ष नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मोतीलाल कुकरेजा होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मत व्यक्त करताना म्हटले की, “गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी आमची संस्था नेहमीच कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद केवळ विद्यार्थी व पालकांपुरता मर्यादित नसून तो संपूर्ण समाजाचा आहे. अशा गौरव समारंभामुळे विद्यार्थी नव्या उंचीवर जाण्यासाठी सदैव प्रेरित होतात.”
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जगदिश शर्मा (अध्यक्ष, नूतन शिक्षण प्रसारक मंडळ), योगेश नाकतोडे (कोषाध्यक्ष), साधना सपाटे (सदस्या), अ. जहीर अ. हमीद शेख (सदस्य), डॉ. शंकर कुकरेजा (सदस्य), प्राचार्य डॉ. श्रीराम गहाणे तसेच प्रा. दामोदर शिंगाडे (मुख्याध्यापक, आदर्श इ. हाय. व कनिष्ठ महाविद्यालय, देसाईगंज) उपस्थित होते. मान्यवर अतिथींनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निहार बोदेले यांनी कौशल्यपूर्णरीत्या केले, तर आभार प्रदर्शन चव्हाण यांनी केले. या समारंभाचे यशस्वी आयोजन प्रा. डॉ. एच. बी. धोटे (प्रभारी प्राध्यापक – सांस्कृतिक विभाग) व प्रा. डॉ. श्रीराम गहाणे (कार्यकारी प्राचार्य) यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्साहाचे व अभिमानाचे वातावरण लाभले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ताप्राप्तीचा हा गौरव सोहळा सर्व उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.



