‘त्या’ अभियंत्याचा मृत्यू नालीत कोसळूनच

नालीत आढळला होता मृतदेह ; शवविच्छेदन अहवालात घातपाताचा कुठलाही क्ल्यू नाही
गडचिरोली : शहरातील मूल मार्गावरील रिलायन्स पेट्रोलपंपाच्या समोर असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या नालीत शुक्रवारी जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंत्याचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी घातपाताचा आरोप फेटाळून लावला असून, शवविच्छेदन अहवालात तसा कुठलाही क्ल्यू आढळलेला नाही.
धनपाल उर्फ विजेश गजानन भलावी (वय ४०) असे मृतकाचे नाव आहे. मूळचे गोंदियातील देवरीचे धनपाल भलावी हे शहरातील पंचवटीनगरात पत्नी विद्यासमवेत राहत. २७ रोजी पासून ते बेपत्ता होते. २९ रोजी त्यांचा मृतदेह मूल रोडवरील नाल्यात आढळला. उत्तरीय तपासणी अहवालात घातपाताची शक्यता नाकारली आहे. त्यांचा मृत्यू नाल्यात कोसळून झाला असावा, असे पो.नि. रेवचंद सिंगनजुडे यांनी सांगितले.



