ऑगस्टमध्ये गडचिरोली आगाराला २ कोटी ३१ लाखांचा नफा
सुगीचे दिवस ; शासनाच्या सवलतींमुळे प्रवाशांचा ओढा वाढला

गडचिरोली : अनेक वर्षांपासून तोट्याचा सामना करणाऱ्या एसटीला शासनाच्या विविध योजनांमुळे सुगीचे दिवस येण्यास सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यात गडचिरोली आगाराला २ कोटी ३१ लाख रुपयांचा नफा झाला आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात एसटीला अतिशय कमी प्रमाणात प्रवासी मिळतात, असा अनुभव होता. मात्र, यावर्षी याच महिन्यात नफा मिळाला.
कोरोना कालावधीत दोन वर्षे एसटी सेवा बंद होती. कोरोनातून सावरताच कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी दोन महिने संप केला. या दोन घटनांमुळे एसटीची आर्थिक स्थिती अतिशय बिघडली. डिझेल व सुटे भाग खरेदी करण्यासाठीही पैसे राहत नव्हते. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नव्हते. त्यामुळे एसटी आता बुडणार की काय, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र, शासनाने विविध योजना सुरू केल्या.
या योजनांमुळे प्रवाशांचा एसटीकडे ओढा वाढला. परिणामी एसटीचे उत्पन्न वाढले. ऑगस्ट महिन्यात पावसाळा असतो. त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी असते, हा दरवर्षीचा अनुभव होता. मात्र, यावर्षी पावसाळ्यातही एसटी फुल होती.
ऑगस्ट महिन्यात पावसाळा असतो. या कालावधीत शेतीची कामे सुरू असतात, तसेच पिकाच्या लागवडीवर बराच खर्च झालेला असतो, त्यामुळे नागरिक फारसा प्रवास करीत नाहीत. मात्र, यावर्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये १४ ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जमा झाले. १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन होते. हातात पैसा आल्याने बहुतांश बहिणी राखी बांधण्यासाठी बसने भावाच्या गावी एसटीने गेल्या. त्यातही अर्धेच तिकीट असल्याने इतर वाहनांपेक्षा महिला एसटीने प्रवास करण्यास अधिक पसंती दर्शवतात.
गडचिरोली एसटी विभागाला ऑगस्ट महिन्यात २ कोटी ३१ लाख रुपयांचा नफा झाला आहे. त्याचबरोबर याच महिन्यात राज्यभरात एसटी महामंडळाला १६ कोटी ८७ लाख रुपयांचा नफा झाला आहे. याबाबत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करणारे पत्र पाठवले आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाचे कौतुक केले आहे.



